औशातील मोबाइल शॉपी चोरीचे धागेदोरे हरियाणात; मेवातमधून दोघे अटकेत, चोरीची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:15 IST2025-07-17T17:08:12+5:302025-07-17T17:15:01+5:30

औसा, पुणे, लातूर, नांदेडमधील हरियाणाच्या चोरट्यांचे ‘मोबाइल फोडी सर्किट’ उघड! 

Mobile shop theft in Ausha traced to Haryana; Two arrested from Mewat, confess to theft | औशातील मोबाइल शॉपी चोरीचे धागेदोरे हरियाणात; मेवातमधून दोघे अटकेत, चोरीची कबुली

औशातील मोबाइल शॉपी चोरीचे धागेदोरे हरियाणात; मेवातमधून दोघे अटकेत, चोरीची कबुली

औसा (जि. लातूर) : येथील तहसील कार्यालयासमोरील मोबाइल दुकान फोडून त्यातील मोबाइल, लॅपटॉपसह एकूण १६ लाख ९८ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. या घटनेतील चोरट्यांचा शोध लागला आहे. उरुळी (जि. पुणे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत याचप्रमाणे धाडसी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या तपासात तेथील पोलिसांनी दोन आरोपींना मेवात हरियाणातून अटक केली. पोलिस तपासात त्या आरोपींनी औशातील गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर येथील कोठडीतील आरोपींना न्यायालयाच्या परवानगीने औसा न्यायालयात हजर केले. तेव्हा १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, हमीद हुसेन अब्दुल करिम (रा. हिदायत कॉलनी, मेवात, जि. नूँह हरियाणा), हाफिज शरीफ खान (रा. ग्राम घाटगाव फिरोजपूर शमशाबाद जि. नुँह) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चाेरीतील मुख्य आरोपी जियाऊद्दीन इमामोद्दीन खान हा फरार झाला आहे. वरील तिघे हे सराईत गुन्हेगार असून लातूर, नांदेड, पुण्यासह इतरत्र त्यांनी मोबाइल दुकाने फोडल्याचे गुन्हे दाखल झाले.

औशातील मुख्य रस्त्यावरील जी.एम. मोबाइल दुकान रस्त्यावर कार लावून फोडले होते. आरोपी मुद्देमालासह फरार होते. दरम्यान, आरोपींनी उरुळी पोलिस ठाणे हद्दीतील मोबाईलचे दुकान फोडून ३२ लाखांचा ऐवज पळविला होता. या गुन्ह्याचा तपासात उरुळी येथील पोलिसांनी दोन आरोपींना मेवात येथून पकडून आणून चौकशी केली असता औशासह इतरत्र चोरी केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्या आरोपींना पुणे येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी झाली. औसा पोलिसांनी न्यायालयाकडे येथे घडलेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत आरोपींना ताब्यात देण्याची विनंती केली. न्यायालयाच्या परवानगीनुसार येरवडा येथून आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोघा आरोपींना १६ जुलै रोजी अटक दाखविण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सुनील रजितवाड, सपोनि. एस.व्ही. मुनाळे, रतन शेख, हणमंत पडिले, म्हात्रे, बेग यांनी परिश्रम घेतले.

अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास
औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालयासमोरच्या जीएम मोबाईल दुकानावर मंगळवारी पहाटे ३. १६ ते ३. १८ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत धाडसी चोरी केली. सिनेस्टाईल पद्धतीने कार रस्त्यावर लावून दुकानाचे शटर तोडत अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोन , १३ मोटोरोलो कंपनीचे मोबाईल, ३ डमी फोन्स आणि २ लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज लंपास केला.

Web Title: Mobile shop theft in Ausha traced to Haryana; Two arrested from Mewat, confess to theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.