Latur: रुग्णाला नेण्याचा कॉल आला, चालकाने चावी फिरवताच १०८ रुग्णवाहिकेला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:31 IST2025-07-31T17:30:58+5:302025-07-31T17:31:57+5:30
इंजिनमध्ये बिघाड, ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटासारख्या आवाजात जळाली संपूर्ण रुग्णवाहिका

Latur: रुग्णाला नेण्याचा कॉल आला, चालकाने चावी फिरवताच १०८ रुग्णवाहिकेला भीषण आग
औसा (जि. लातूर) : ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभी केलेली १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका आज दुपारी आगीत भस्मसात झाली. आग एवढी भीषण होती की, संपूर्ण गाडी काही मिनिटांत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
रुग्णालयात दाखल झालेल्या एका गंभीर पाय दुखापतग्रस्त रुग्णाला लातूरला हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले होते. चालक युवराज कांबळे यांनी एम.एच.१४ सी.एल.०८५८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करताच इंजिनमधून कट-कट आवाज येऊ लागले. दोन प्रयत्नांनंतर गाडीच्या समोरील भागातून अचानक आग लागली. चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने काही क्षणांतच उग्ररूप धारण केले.
गंभीर बाब म्हणजे, रुग्णवाहिकेत दोन ऑक्सिजन सिलिंडर होते. आगीदरम्यान सिलिंडरमधून स्फोटासारखे आवाज येत होते, ज्यामुळे आजूबाजूचे कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.बी. थडकर आणि त्यांच्या टीमने प्रसंगावधान राखत रुग्णांना वेळीच बाहेर काढले.
अग्निशमन दलाचा उशीर
घटनेनंतर स्थानिक नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र बंब तब्बल ५० मिनिटे उशीरा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका कोळशात रूपांतरित झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
१०८ साठी जागेचा प्रश्न कायम
रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांना प्रवेश व पार्किंग सुविधा दिली जात असली तरी १०८ रुग्णवाहिका मात्र मागच्या रस्त्यावर उभी केली जाते, ही वस्तुस्थिती उघड झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील यांनी यासंदर्भात नगरपरिषद व पोलिसांकडे पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
१२ वर्ष जुनी गाडी; नुकतीच देखभाल झाली होती
सदर १०८ रुग्णवाहिका मागील १२ वर्षांपासून सेवेत असून काही महिन्यांपूर्वीच तिची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला आणि आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली हे अधिकृत तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.