'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:59 IST2024-02-12T18:57:31+5:302024-02-12T18:59:04+5:30
महात्मा बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा.

'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी
उदगीर : वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चास रेल्वे स्टेशनजवळील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून प्रारंभ झाला.
माजी आ. मनोहर पटवारी व बालाजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात माेर्चा पोहोचल्यानंतर लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष सुदर्शन बिरादार म्हणाले, लिंगायत, हिंदू लिंगायत व वाणी हे एकाच जातीची नावे आहेत. त्यामुळे वाणी नावाला लागू असलेले आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लागू होण्यासाठी शासनाने शुद्धिपत्रक काढावे. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून सरसकट लिंगायतांना कर्ज मिळावे. त्यासाठी २ हजार कोटींची तरतूद करावी. महात्मा बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका पातळीवर वसतीगृह सुरू करावे अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बालाजी पाटील चाकूरकर, भरत करेप्पा, बसवराज बाळे, शिवराज नावंदे गुरुजी, योगेश उदगीरकर आदींची भाषणे झाली. या मोर्चात लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील, जिल्हाध्यक्ष करिबसवेश्वर पाटील, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, शिवानंद भुसारे, उदगीरातील लिंगायत महासंघाचे बसवराज बाळे, निलेश हिप्पळगे, भीमाशंकर शेळके, चंद्रकांत शिरसे, सुभाष शेरे, महेश धोंडीहिप्परगेकर, अमरनाथ मुळे, अशोक तोंडारे, बापूराव शेटकार, रत्नेश्वर गोगे, गंगाधर बिरादार माळेवाडीकर, संगमेश्वर धनुरे, शांतवीर मुळे आदी सहभागी झाले होते.