पहिल्या स्तरामध्ये लातूर आल्यानंतर सोमवारी अनलॉकला सुरुवात झाली. सर्व व्यवहार सुरळीत झाले. शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ उघडी राहत आहेत. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, कामगार आणि नागरिकांना दिलासा मिळाला. शहरासह जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा एकदा जोमाने फिरू लागले आहे. मात्र शासनाने निर्बंध शिथिल करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार कोरोना लागण होण्याचे जिल्ह्याचे एकूण प्रमाण तपासणी केलेल्यांपैकी ५ टक्क्यांहून कमी असले पाहिजे. त्याचवेळी सर्व कोरोना उपचार रुग्णालयांतील आयसीयू बेड ७५ टक्के रिकामे राहिले पाहिजेत. हे केवळ प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या हाती नसून प्रत्येक नागरिकांच्या नियम पाळण्यावर अवलंबून आहे.
मास्क अनिवार्य, अन्यथा कारवाई
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. बाजारपेठेत, मुख्य रस्त्यांवर तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वावरताना मास्क अनिवार्य आहे. व्यक्तिगत स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
४५ रुग्ण पॉझिटिव्ह
सोमवारी ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. तरीही सद्य:स्थितीत १०८ जण आयसीयूमध्ये आहेत. १२ रुग्ण मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर, ५२ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आणि २१३ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर आहेत. सोमवारचा पॉझिटिव्हिटी रेट ३.४ असून, सुमारे ८२ टक्के आयसीयू बेड रिकामे आहेत. तसेच ऑक्सिजन बेडसह जनरल बेड ५ हजार ३.४ रिकामे आहेत.