- महेश पाळणेलातूर : महाराष्ट्र केसरीचा आखाडा पुन्हा एकदा लातूरच्या मल्लविद्येने गाजला. लातूरचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या पठ्ठ्यांनी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन्ही गदा ताब्यात घेत कुस्तीत पवारांचा पॉवरफुल करिश्मा करून दाखविला आहे.
विजेतेपद व उपविजेतेपदाच्या गदा काकांच्या पठ्ठ्यांनी चौथ्यांदा आणून महाराष्ट्रात आपली कुस्तीतील ताकद दाखवून दिली आहे. ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर अटितटीच्या लढतीत एक गुणांनी विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला. उपविजेता असलेला महेंद्र गायकवाडही काका पवारचाच पठ्ठा. दोन्ही गदा पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातच आल्याने काका पवारांच्या शिष्यांनी ऐतिहासिक पराक्रम केला. त्यामुळे कुस्तीतील लातूरची मल्लविद्या अधोरेखित झाली आहे. काकांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले डावपेच व मेहनतीचे फळ या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहायला मिळाली. हा विजय केवळ मल्लांचा नसून लाल मातीतील कष्ट आणि प्रशिक्षणातील मार्गदर्शनाचा विजय आहे, अशी भावना कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी...यापूर्वी पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीतील मल्लांनी तीन वेळा विजेतेपदासह उपविजेत्याची गदा एकाच स्पर्धेत पटकाविली होती. आता पुण्यात झालेल्या या स्पर्धेतून काकांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाने चार वेळा अशी कामगिरी करत रेकॉर्ड केला आहे. २०१९-२० साली बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने मानाची गदा पटकाविली. उपविजेतेपदी लातूरचा शैलेश शेळके राहिला. यानंतर २०२२-२३ साली कोथरूड येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज राक्षेनी विजेतेपद तर महेंद्र गायकवाडने उपविजेतेपद पटकाविले हाेते. धाराशिव येथे २०२३-२४ झालेल्या स्पर्धेत शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी ठरला. तर हर्षवर्धन सदगीर उपमहाराष्ट्र केसरी ठरला. २०२५-२६ या यंदाच्या वर्षात वाघोली येथे झालेल्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने डबल महाराष्ट्र केसरी होत विक्रम केला आहे. उपमहाराष्ट्र केसरीपदी महेंद्र गायकवाड राहिला.
एकूण १७ पदके पटकाविली...विविध वजनी गटात काकाच्या पठ्ठ्यांनी यश मिळविले. ६ सुवर्ण, ६ रौप्य, ५ कांस्यपदक पटकाविले. या खेळाडूंना राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते डीवायएसपी राहुल आवारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांचेही मार्गदर्शन लाभले.
मेहनतीचे फळ...चौथ्यांदा तालमीत दोन्ही गदा आल्याचा आनंद आहे. हे मल्लांच्या मेहनतीचे फळ आहे. - काका पवार, अर्जुन पुरस्कार विजेते.
Web Summary : Kaka Pawar's students secured both Maharashtra Kesari titles for the fourth time, showcasing Latur's wrestling excellence. Harshvardhan Sadgir won, with Mahendra Gaikwad as runner-up. The academy achieved a record-breaking feat, winning multiple medals and highlighting dedication and expert guidance.
Web Summary : काका पवार के छात्रों ने चौथी बार महाराष्ट्र केसरी के दोनों खिताब जीते, जिससे लातूर की कुश्ती उत्कृष्टता का प्रदर्शन हुआ। हर्षवर्धन सदगीर विजेता रहे, जबकि महेंद्र गायकवाड उपविजेता रहे। अकादमी ने कई पदक जीतकर एक रिकॉर्ड तोड़ उपलब्धि हासिल की, जो समर्पण और विशेषज्ञ मार्गदर्शन को उजागर करती है।