लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:33 PM2019-10-25T18:33:21+5:302019-10-25T18:36:47+5:30

अपेक्षेप्रमाणे लातूर व लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसने राखली

Maharashtra Assembly Election 2019 : Strengthen the Congress alliance in Latur district | लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

googlenewsNext

- हणमंत गायकवाड

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत अपेक्षेप्रमाणे लातूर व लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसने राखली तर औसा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले़ दरम्यान, अहमदपूर व उदगीरमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी बळकट केली आहे़ 

सर्वाधिक लक्ष असलेल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुन्हा एकदा त्यांचे काका काँग्रेस उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला आहे़ मंत्रीपद मिळाल्यानंतरही मतदारसंघावर सतत लक्ष ठेवत पकड मजबूत केल्याने पालकमंत्र्यांची लढाई सोपी झाली़ तसेच परंपरागत काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या लातूर शहर मतदारसंघात पुन्हा अमित देशमुख यांची सरशी झाली आहे़ मतदानानंतर दोन दिवस राजकीय पंडितांनी सांगितलेले अंदाज चूक ठरवत देशमुख यांनी लातूरवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे़ तर अपेक्षेप्रमाणे लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे़

अहमदपूर, उदगीर मतदारसंघात भाजपची बंडाळी पराभवाला कारणीभूत ठरली़ अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील तर उदगीरमध्ये संजय बनसोडे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवानंतरही सतत ठेवलेला जनसंपर्क त्यांच्या कामी आला़ औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री आ़ बसवराज पाटील यांच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी जोरदार लढत दिली़ प्रचारात अटीतटीची दिसणारी निवडणूक निकालामध्ये भाजपच्या बाजूने सरकली़ 

ठळक मुद्दे 
1भाजपने औसा मतदारसंघ शिवसेनेकडून स्वत:कडे घेत विजय खेचून आणला़ त्याच वेळी ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला देऊन भाजपतील प्रबळ दावेदारांचा हिरमोड केला़ परिणामी, सेनेपेक्षा नोटाला अधिक मते पडली़   
2लातूर शहर मतदारसंघातील काँग्रेस पराभवाच्या चर्चेचा धुराळा निकालाने जमिनीवर आणला़ 
3अहमदपूर मतदारसंघात भाजपत सर्वाधिक बंडाळी झाली़ राष्ट्रवादी बळकट झाली़
4आ़ भालेरावांना बाजूला ठेवून उदगीरमध्ये नवखा उमेदवार देणे भाजपला महागात पडले़ 
5औशात बंडखोरीनंतरही भाजपने यश मिळविले़ 

हे आहेत विजयी उमेदवार 
भाजप
1. संभाजी पाटील निलंगेकर, निलंगा
2. अभिमन्यू पवार, औसा
काँग्रेस
1. अमित देशमुख, लातूर शहर
2. धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
राष्ट्रवादी
1. बाबासाहेब पाटील, अहमदपूर
2. संजय बनसोडे, उदगीर

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Strengthen the Congress alliance in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.