लातूर : सत्ता स्थापनेवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेत महायुतीच्या नेतेमंडळींनी भाजप-राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईवारी घडवली आहे. गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अर्धा तास बैठक होऊन सत्ता स्थापनेचा निर्धार करण्यात आला.
मिनी मंत्रालय असलेली जिल्हा परिषद निवडणूक भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेने महायुती करून लढवली. त्यात भाजप १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १२, शिंदेसेना १ अशा एकूण ३१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. येत्या सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेतेमंडळींनी आपल्या सदस्यांना मुंबईवारी घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळी हे सदस्य मुंबईत दाखल झाले.
पन्हाळगड निवासस्थानी महत्त्वाची बैठक...पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड निवासस्थानी आयोजित बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील-मुरुमकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, अरविंद पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती होती.
सत्ता स्थापनेवर खलबते...जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची १६ मार्चला निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी एकत्रितपणे राहून महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा ३२ सदस्यांनी निर्धार केला. राष्ट्रवादीचे गटनेते प्रा. दिलीपकुमार मटके यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी आभार मानले.
सुरुवातीला पुणे, नंतर मुंबई...फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून महायुतीतील जिल्हा परिषद सदस्यांना प्रारंभी लातूर, त्यानंतर पुणे येथे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. सदस्य लातूरनंतर पुण्यात पोहोचल्यावर मुंबईला नेण्यात आले.
सोमवारी सकाळी होणार आगमन...महायुतीतील सर्व सदस्य १५ मार्चपर्यंत मुंबईत मुक्कामी असणार आहेत. रविवारी रात्री निघून सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेत दाखल होणार आहेत. महायुतीच्या सदस्यांसोबत एक अपक्ष सदस्यही आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा पेच कायम...अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ बैठक होऊन विचारविनिमय करण्यात आला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याचे पालन करण्यात येणार असल्याचे महायुतीतील काही सदस्यांनी सांगितले.
पहिल्यांदाच पाहिले विधानभवन...सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी जिल्हा परिषद सदस्यांनी विधानभवन परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा आपण पहिल्यांदाच विधानभवन परिसरात आल्याचे काही सदस्यांनी सांगितले.
Web Summary : To secure power in Latur ZP, Mahayuti leaders moved council members to Mumbai. A meeting solidified their resolve before the election. Members will stay in Mumbai until the election and return to Latur to form the government.
Web Summary : लातूर जेडपी में सत्ता हासिल करने के लिए, महायुति नेताओं ने परिषद सदस्यों को मुंबई स्थानांतरित कर दिया। चुनाव से पहले एक बैठक में उनके संकल्प को मजबूत किया गया। सदस्य चुनाव तक मुंबई में रहेंगे और सरकार बनाने के लिए लातूर लौटेंगे।