रात्री गावाला जायला वाहन न मिळाल्यानं तरुणांनी डेपोमधून पळवली एसटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:42 IST2021-02-04T21:41:47+5:302021-02-04T21:42:09+5:30
एसटीनं खांबांना धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान; एसटी प्रशासनाकडून अद्याप तक्रार नाही

रात्री गावाला जायला वाहन न मिळाल्यानं तरुणांनी डेपोमधून पळवली एसटी
लातूर: रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी एसटी न मिळाल्यानं बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना घडली. दारुच्या नशेत तीन-चार तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.
गावात जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी न मिळाल्यानं मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवली. काही अंतर कापल्यानंतर एसटीनं विजेच्या दोन खांबांना धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. विजेचा खांबही कोसळला. बस स्थानकात झोपलेल्या एसटीच्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजलं. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी एसटीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेळगी गावात एसटी सापडली.
एसटीनं विजेच्या खांबाला धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र अद्याप तरी एसटी महामंडळाकडून याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. यामुळे एसटी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला असून प्रशासन एसटी पळवणाऱ्यांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.