Latur: पंचशील ध्वज लावताना उच्चदाबाच्या वीज तारांना लोखंडी पाईप चिकटला; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:31 IST2025-07-12T17:30:39+5:302025-07-12T17:31:50+5:30

लातूर तालुक्यातील कोळपा येथील घटना

Latur: While hoisting the Panchsheel flag, an iron pipe got stuck to the high-voltage power lines; two died | Latur: पंचशील ध्वज लावताना उच्चदाबाच्या वीज तारांना लोखंडी पाईप चिकटला; दोघांचा मृत्यू

Latur: पंचशील ध्वज लावताना उच्चदाबाच्या वीज तारांना लोखंडी पाईप चिकटला; दोघांचा मृत्यू

लातूर : तालुक्यातील कोळपा येथील कासारखेडा रोडवरील उड्डाणपुलालगत असलेल्या अंबेकर कॉम्प्लेक्सनजीक बौद्धविहारासाठी देण्यात आलेल्या जागेत पंचशील ध्वज लावत असताना गुरुवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांना विजेचा शॉक लागल्याने ते जागेवर कोसळली. त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोळपा येथील अंबेकर कॉम्प्लेक्सनजीक बौद्धविहारासाठी काही महिन्यांपूर्वी जागा देण्यात आली होती. त्या जागेवर पंचशील ध्वज लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ शंकर जोडपे (वय ४०), सूरज देवराव गायकवाड (२५), अंकुश मारोती कांबळे (२९) व अजित लक्ष्मण जाधव (१४) हे चौघेजण सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. ज्या ठिकाणी पंचशील ध्वज लावण्यात येत होता, तेथून महावितरणची ११ केव्हीची विद्युत लाईन गेली आहे. यावेळी सूरज गायकवाड व अंकुश कांबळे हे दोघेेजण जवळपास २० फुटांच्या पाईपाला ध्वज लावून उभा करत होते, तो पाईप विद्युत तारेला लागल्याने दोघांना विजेचा शॉक लागताच दोघेही खाली कोसळले. लागलीच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तत्काळ लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले.

पोलिस अधीक्षकांकडून घटनेची पाहणी...
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अमोल तांबे, पोलिस उपाधीक्षक, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच सिध्देश्वर श्रीगिरे, पोलीस पाटील नंदकिशोर अंबेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी श्रीगिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होती. याप्रसंगी पोलीस अधीक्षक तांबे यांनी घटनेची माहिती घेत ११ केव्ही विद्युत तारांची पाहणी केली तसेच मयताच्या कुटुंबाच्या घरी भेट दिली.

ग्रामस्थांची रुग्णालयात धाव...
बौद्धविहारासाठी पंचशील ध्वज लावत असताना सूरज देवराव गायकवाड (२५), अंकुश मारोती कांबळे (२९) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांसह नातेवाईकांनी लातूर येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गर्दी होती. मृताचे शवविच्छेदन झाल्यावर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Latur: While hoisting the Panchsheel flag, an iron pipe got stuck to the high-voltage power lines; two died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.