Latur: बसच्या धडकेत भाजी विक्रेता शेतकरी जागीच ठार, औसा टी-पाँईटवर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:08 IST2025-03-20T18:07:51+5:302025-03-20T18:08:50+5:30
औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत.

Latur: बसच्या धडकेत भाजी विक्रेता शेतकरी जागीच ठार, औसा टी-पाँईटवर अपघात
- संदीप शिंदे
औसा ( लातूर) : शहरातील टी-पाँईटवर गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बसस्थानकाकडे वळण घेत असलेल्या एसटी बसला भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेता शेतकऱ्याच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम बाजीराव जाधव (वय ५५ रा. करजगाव, ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
लातूरहून मेढा (जि. सातारा) आगाराची बस (एमएच १४ एल.एक्स. ५७३४) ही साताऱ्याकडे निघाली होती. गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बस औसा टी-पाँईंटवर आली असता गावातील बसस्थानकाकडे वळाली. यावेळी तुळजापूर मोडवरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने बसच्या मागील बाजूला जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला भाजीविक्रीसाठी बसलेले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या अंगावर गेली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषित केले. औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
बसमधील प्रवासी सुखरूप...
दररोज सकाळी ६ वाजता लातूरहून औसामार्गे सातारा येथे बस जाते. गुरुवारी अपघात झालेल्या बसमध्ये १३ प्रवासी होते. बसचा वेग कमी असल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन दिल्याचे औशाचे आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले.
उड्डाणपूलाचा विरोध ठरतोय जीवघेणा...
रत्नागिरी-नागपूर आणि लातूर-उमरगा या दोन महामार्गावर येणाऱ्या औसा टी-पाँईंटवर नियोजित उड्डाणपूल होता. मात्र, काही लोकांनी त्यास विरोध केल्याने उड्डाणपूल वगळून महामार्गाचे काम पुर्ण झाले. औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त अपघात झाले असून, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.