Latur: तेरणा काठ पुन्हा गारठला, औरादचे तापमान ८ अंशांवर ! पिकांना बांधा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:37 IST2025-12-09T19:37:17+5:302025-12-09T19:37:50+5:30
तेरणा नदीकाठच्या भागात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

Latur: तेरणा काठ पुन्हा गारठला, औरादचे तापमान ८ अंशांवर ! पिकांना बांधा होण्याची शक्यता
- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि.लातूर) : मागील महिन्यात थंडीने जोर धरलेला असतानाच मध्यंतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. तापमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; पण पुन्हा एकदा शनिवारपासून किमान तापमानात निचांकी घट सुरू झाली असून, सोमवारी तर या वर्षातील सर्वांत कमी म्हणजे ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा थंडीने पिकांना बांधा होण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी सीमावर्ती भागात वाढत्या थंडीमुळे या भागातील बाजारपेठ, रस्त्यांवर दुपारपर्यंत शुकशुकाट राहत आहे. तेरणा नदीकाठच्या भागात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. एका आठवड्यात किमान तापमान तब्बल दहा अंशांने कमी होऊन सोमवारी ८ अंश तापमानाची नोंद औराद हवामान केंद्रावर झाली असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमान नीचांकी स्तरावर खाली आल्याने दिवसभर थंडगारवा झोंबत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्धांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पहाटेच्या सुमारास बाहेर पडू नये. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यदुनाथ चिद्रेवार यांनी यांनी सांगितले.
शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव...
वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी औराद शहाजानी व परिसरातील नागरिक सकाळी स्वेटर, कान टोपी, गरम उलनचे कपडे वापरत असून, शेकोटी पेटवून ऊब घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पिकांची वाढ खुंटते...
तापमान १० अंशांपेक्षा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटते. यामुळे शेतकऱ्यांनी धूर फवारणी करावी. त्यामुळे बागेत तापमान वाढते आणि नुकसान कमी होते असे शेतकरी भागवत बिरादार यांनी सांगितले.