- हरी मोकाशे
लातूर : आर्थिक अडचणींमुळे पोटाची भ्रांत सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या अन् नेहमी काळजाच्या तुकड्याच्या हृदयावर उपचार कसे होतील, अशा चिंतेत असलेल्या साडेतीनशे कुटुंबांना जनआरोग्य योजना आणि दानशूरांनी मदतीचा हात दिला आहे. हृदयरोगी ३५१ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे. माता-पित्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पसरली आहे.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यात काही बालकांना हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच काही बालकांत श्वास घेण्यास त्रास हाेणे, शरीराचा रंग निळसर पडणे, थकवा जाणवणे, वजन न वाढणे, वारंवार आजारी पडणे, छातीचे ठोके कमी-जास्त होणे अशी लक्षणे दिसून आल्याने माता-पित्यांनी तपासणी केली असता हृदयविकार असल्याचे निदान झाले.
जनआरोग्य योजना व समाजातील दानशूरांच्या मदतीने हृदयविकाराच्या बालकांवर शहरातील विवेकानंद रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर, डॉ. प्रशांत पाटील, बालहृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. सारंग गायकवाड यांनी केली आहे. त्यांना डॉ. सी. के. औरंगाबादकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश सोनार, डॉ. दीप्ती देशमुख, डॉ. प्रमोद तोष्णीवाल, हृदयविकार भूलतज्ज्ञ डॉ. प्रवीण लोव्हाळे, डॉ. श्रीकृष्ण कुलकर्णी, डॉ. आरती झंवर, डॉ. कल्याणी सास्तुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी जाधव, डॉ. अभय सावरगावकर, शशिकांत मेमाने, निहाल बिन नासीर, सुचेता महिंद्रकर, श्रीपाद कुलकर्णी, नेताजी भोईबार, विष्णू पंडगे, सोमनाथ कोकणे, शिवाजी उपळे, दत्ता पळसे, धनंजय कुलकर्णी, संदीप पाटील आदींनी सहकार्य केले.
या यशाबद्दल डॉक्टरांचे कौतुक विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. अरुणा देवधर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी, डॉ. गौरी कुलकर्णी यांनी केले.
३५० हून अधिक मोफत शस्त्रक्रिया...गेल्या अडीच वर्षांत ३५१ शस्त्रक्रिया विवेकानंद रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. विशेषत जन्मजात हृदयविकार असलेल्या तीन महिन्यांच्या बालकांपासून ते ६५ वर्षीय ज्येष्ठांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
वेळेची बचत, मानसिक ताण कमी...हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबई-पुण्याला धाव घ्यावी लागत होती. आता ही सुविधा लातुरात असल्याने वेळ, पैशाची बचत झाली आहे. तसेच मानसिक ताण कमी झाला आहे.
१४६ ओपन हार्ट सर्जरी...अडीच वर्षांत एकूण ३५१ मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने १४६ ओपन हार्ट तर २०५ बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
बालहृदयरोग शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू...मार्चपासून विवेकानंद रुग्णालयात बालरोग हृदयशस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचा मराठवाड्यातील बालहृदय रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणे दिसल्यास सल्ला घ्यादूध पिताना बाळास धाप लागणे, ओठ, नखे अथवा हाता-पायांचे तळवे निळसर पडणे, बाळ नेहमीपेक्षा जास्त झोपणे, वजनात वाढ न होणे, वारंवार आजारी पडणे, हृदयाचे असामान्य वाटणे, अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.-डॉ. नितीन येळीकर, बालहृदयरोग तज्ज्ञ
Web Summary : In Latur, 351 children from poor families received free heart surgeries at Vivekanand Hospital, thanks to government schemes and donors. Doctors performed open-heart and keyhole surgeries, offering new hope and relieving financial burdens for families facing congenital heart defects in their children. Early diagnosis and treatment are crucial.
Web Summary : लातूर में, सरकारी योजनाओं और दानदाताओं के कारण विवेकानंद अस्पताल में 351 गरीब बच्चों को मुफ्त हृदय शल्य चिकित्सा मिली। डॉक्टरों ने ओपन-हार्ट और कीहोल सर्जरी की, जिससे परिवारों को नई उम्मीद मिली और बच्चों में जन्मजात हृदय दोष के कारण होने वाले वित्तीय बोझ से राहत मिली। शीघ्र निदान और उपचार महत्वपूर्ण हैं।