Latur: पंढरपूरहून परताना विश्रांतीसाठी थांबलेल्या सहा वारकऱ्यांना चाकूरजवळ लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:09 IST2025-12-18T16:09:26+5:302025-12-18T16:09:43+5:30
याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Latur: पंढरपूरहून परताना विश्रांतीसाठी थांबलेल्या सहा वारकऱ्यांना चाकूरजवळ लुटले!
चापोली (जि. लातूर) : महामार्गालगत विश्रांतीसाठी थांबलेल्या कारमधील सहा वारकऱ्यांना अज्ञाताने लोखंडी रॉडचा धाक दाखवीत लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटे २:३० च्या सुमारास घडली. यावेळी १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटारूंनी लुटला आहे. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर येथील महावितरणमध्ये तंत्रज्ञ असलेले यादव किशन केंद्रे (रा. माळहिप्परगा, ता. जळकोट) हे इर्टिका कारने (एमएच ५५ बी १६४८) पंढरपूर येथून गावी निघाले होते. दरम्यान, चालकाला झोप येत असल्याने हे वाहन चापोली उड्डाण पुलावर महामार्गालगत थांबविण्यात आले. वारकरी वाहनातच विश्रांती घेत होते. यावेळी बुधवारी पहाटे २:३० च्या सुमारास चौघांनी यादव किशन केंद्रे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर पाचजणांना लोखंडी रॉडने मारहाण करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील सोने, चांदी, मोबाईल आणि रोख रक्कम लुटून पसार झाले. याबाबत यादव किशन केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चाकूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही बंद; सुरक्षा वाऱ्यावर
चापोलीतून जाणाऱ्या महामार्गावर सुरक्षा आणि देखरेखीसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे महामार्गावर लुटालुटीच्या घटना घडत आहेत.