लातूरचे मंदिरांचे शिल्पकार गणी सय्यद यांच्याकडून विठ्ठलचरणी चांदीचा मुकुट अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:31 IST2025-07-05T19:30:11+5:302025-07-05T19:31:14+5:30

गणी सय्यद हे दगडी मंदिराचे काम करतात. त्यांनी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यात अनेक ठिकाणी मंदिराची कामे केली आहेत.

Latur sculptor Gani Sayyed offers a silver crown to Lord Vitthal | लातूरचे मंदिरांचे शिल्पकार गणी सय्यद यांच्याकडून विठ्ठलचरणी चांदीचा मुकुट अर्पण

लातूरचे मंदिरांचे शिल्पकार गणी सय्यद यांच्याकडून विठ्ठलचरणी चांदीचा मुकुट अर्पण

लातूर : मंदिराचे सुंदर दगडी शिल्प घडविणाऱ्या लातुरातील गणी सय्यद यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचरणी एक किलो ९ तोळ्यांच्या चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. त्यांची श्रद्धा आणि भक्ती ही सर्वांना एकता आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी असल्याचे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शुक्रवारी सांगितले.

गणी सय्यद हे दगडी मंदिराचे काम करतात. त्यांनी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यात अनेक ठिकाणी मंदिराची कामे केली आहेत. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काम सुरू असताना त्यांनी कोरीव शिळा पुरविल्या. त्यामुळे त्यांचे पंढरीला येणे-जाणे वाढले. तिथेच काम करीत असल्याने आपल्याला विठ्ठल पावला. आपणही विठ्ठलचरणी सेवा करावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी देवस्थानच्या कार्यालयात ३० जून रोजी चांदीचा मुकुट अर्पण केला. यावेळी देवस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गणी सय्यद यांचा सत्कार केला. यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, केशव कोद्रे यांची उपस्थिती होती.

मी नमाज पठण करतो...
गणी सय्यद म्हणाले, मी नमाज पठण करतो; परंतु माझ्या आजोबांपासून आम्हाला सर्वधर्म समभावाची शिकवण मिळाली आहे. वारकरी संप्रदाय सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. संतांची शिकवण माणुसकीची आहे. माणूस धर्माच्या प्रसाराची आहे. त्यामुळे आम्ही नमाज अदा करीत असलो तरी गावखेड्यात कीर्तन-भजनही आमच्या कानी पडले आहे. त्यामुळे विठ्ठल चरणी मी चांदीचा मुकुट अर्पण करीत आहे.

Web Title: Latur sculptor Gani Sayyed offers a silver crown to Lord Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.