भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:28 IST2026-04-06T14:27:51+5:302026-04-06T14:28:14+5:30
निलंगा तालुक्यातील कवठा पाटी - तुपडीजवळील घटना

भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार
केळगाव (जि. लातूर) : भरधाव वेगातील दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन सोहेल रहीम शेख (२२, रा. शिऊर धनेगाव, ता. निलंगा) व अमर सुनील देशमुख (३२, रा. गौर मसलगा, ता. निलंगा) हे दोन्ही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील कवठा पाटी - तुपडी दरम्यान रविवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. या अपघाताची पानचिंचोली पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यातील शिऊर (धनेगाव) येथील सोहेल रहिम शेख हा रविवारी दुपारी दुचाकी (एमएच २४, वाय ९७७८) वरून आजोळ असलेल्या तुपडी गावाकडे निघाला होता. तेव्हा गौर (मसलगा) येथील अमर सुनील देशमुख हा दुचाकी (एमएच २४, एएल. ८४१०) वरून गौरकडे निघाला होता. दोन्ही वाहनचालक भरधाव वेगात वाहन चालवित होते. हे दोघे कवठा पाठी व तुपडी दरम्यान आले असता त्यांच्या दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. त्यात सोहेल शेख याचा जागीच मृत्यू झाला, अमर देशमुख यांचा लातुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऊरुसास जाताना घडली घटना
रविवारी तुपडी येथे उरुस सुरू आहे. या यात्रेसाठी सोहेलची आई व बहीण अगोदरच गेले होते. सोहेलही यात्रेस निघाला होता. मात्र, रस्त्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली. कुटुंबास तो एकुलता एक मुलगा होता.
दोघेही अविवाहित
मयत सोहेल व अमर हे दोघेही अविवाहित होते. अमर याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. रस्त्याचा अंदाज न आल्याने हा समोरासमोर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.