Latur: बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका; अंतिम टप्प्यात होतील नावे घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:45 IST2025-11-12T15:44:57+5:302025-11-12T15:45:20+5:30
दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत.

Latur: बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका; अंतिम टप्प्यात होतील नावे घोषित
लातूर : जिल्ह्यातील चार नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत. अजूनही भाजपा, काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम टप्प्यात नावे घोषित केली जातील, अशी शक्यता आहे.
उदगीर नगरपालिकेत महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी केली आहे. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. निलंगा नगरपालिकेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पक्षनिरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक आपापल्या वार्डात कामाला लागले आहेत. तर काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचे दोन गट पडले असून दोघांनीही इच्छुकांच्या याद्या तयार केल्या आहेत. याशिवाय, इतर राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे.
औशात महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लढत होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही तयारी केली जात आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्यासह भाजपाने यंदा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. उदगीर, निलंगा, अहमदपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
सहकार मंत्र्यांच्या कार्यालयात रांगा...
अहमदपूर नगरपालिका निवडणुकीसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या भेटीसाठी राेजच रांगा लागत आहे. भाजपानेही मुलाखतींचा सपाटा लावला आहे. याशिवाय, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांनीही स्वतंत्रपणे तयारी चालविली आहे. रेणापूर नगरपंचायतीत भाजपाचे आ. रमेश कराड व काँग्रेसकडून माजी आ. धीरज देशमुख समर्थक तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षात बंडखोरी टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली जात आहे.
कुठे किती जागा...
उदगीर ४०
निलंगा २३
अहमदपूर २५
औसा २३
रेणापूर नगर पंचायत १७