लातूर-निलंगा महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा! वर्षभरात ६२५ अपघात; ३०५ ठार तर २५५ जण गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: March 27, 2023 20:47 IST2023-03-27T20:35:25+5:302023-03-27T20:47:26+5:30
जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

लातूर-निलंगा महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा! वर्षभरात ६२५ अपघात; ३०५ ठार तर २५५ जण गंभीर जखमी
लातूर : जिल्ह्यात वर्षभरात विविध मार्गावर ६२५ अपघात झाले आहेत. यात ३०५ जणांचा बळी गेला असून, २५५ जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस अपघात आणि मृतांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
एकाच आठवड्यात लातूर-निलंगा-औराद शहाजानी महामार्गावर माेठे दाेन अपघात झाले. यात तब्बल ८ जण ठार झाले आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याचे प्राथमिक चाैकशीत समाेर आले आहे. लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या नव्या महामार्गावर आता अपघाताच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. महामार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे वाहनांचा वेगही अमर्याद झाला आहे. अनेक वाहनचालकांच्या जिवावर हयगय अन् निष्काळजीपणा बेतला आहे. लातूर जिल्ह्यात काही भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही भागांत दुरुस्ती केली आहे. परिणामी, वाहनांचा वेग वाढला आहे. सर्वाधिक वाहन अपघात दुचाकी, चारचाकी कार, जीपचे झाले आहेत.
वाहनांचा अमर्याद वेग नडला; अपघातात नाहक जीव गेला! -
भरधाव वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे, वाहनावरचा ताबा सुटणे, ओव्हरटेक करणे अशा अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. २०२१ मधील अपघाताची आकडेवारी, त्यातील मृत्यूची संख्या चिंताजनक आहे. ज्येष्ठांपेक्षा तरुणांची संख्याच यामध्ये अधिक आहे. ‘वाहनांचा अमर्याद वेग अनेकांना नडला अन् अपघातात नाहक जीव गेला...’ अशी स्थिती अपघातग्रस्तांची आहे.
अख्खे कुटुंबच झाले उद्ध्वस्त... -
गत वर्षभरात झालेल्या अपघातात काहींचे अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण ६२५ अपघातात ३०५ ठार, तर २५५ गंभीर जमखी झाले आहेत. या अपघाताने अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेकांचे अख्खे कुटुंबच संपले आहे.
वाहन चालविताना अशी घ्या काळजी... -
१) वाहतूक नियमांचे पालन करावे.
२) वेगमर्यादेचे उल्लंघन करु नका.
३) वाहन चालविताना सीटबेल्ट लावा.
४) शक्यताे माेबाइलवर बाेलू नका.
५) सतत वेगावर नियंत्रण ठेवावे.
६) मद्यप्राशन करून गाडी चालवू नका.
आरटीओच्या पाहणीत आढळले २७ ब्लॅक स्पाॅट... -
लातूरच्या आरटीओ विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात राज्य आणि महामार्गावर एकूण २७ ब्लॅक स्पाॅट आढळून आले आहेत. याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ते ब्लॅक स्पाॅट दूर करण्यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. हे ब्लॅक स्पाॅट दूर झाले तर अपघाताच्या घटनांत घट होतील. - आशुताेष बारकूल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर
अन् आकडे बाेलतात... २०२२ मध्ये झालेले अपघात... -
प्रकार अपघात मृत्यू
पादचारी १४२ ६६
दुचाकी ३३३ १६२
ऑटाेरिक्षा २१ १३
कार ११७ ५२
ट्रक १२ १२
सायकल ०० ००
एकूण ६२५ ३०५