गोवा बनावटीच्या मद्यविक्रीवर सर्जिकल स्ट्राईक! ४ नामांकित हॉटेलचे परवाने कायमस्वरूपी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 19:26 IST2026-03-02T19:25:39+5:302026-03-02T19:26:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो' आदेश आयुक्तांनीही ठेवला कायम! लातूरच्या ४ हॉटेल मालकांचे अपील फेटाळले

गोवा बनावटीच्या मद्यविक्रीवर सर्जिकल स्ट्राईक! ४ नामांकित हॉटेलचे परवाने कायमस्वरूपी रद्द
लातूर : जिल्ह्यात गोवा राज्य निर्मित आणि बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या हॉटेल आणि बिअर बार मालकांविरुद्ध लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. १ नोव्हेंबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, नियमबाह्य कृत्य करणाऱ्या चार परमीट रूमचे परवाने साेमवारी कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, विभागीय उप आयुक्त बी.एच. तडवी यांच्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १) हॉटेल आरुष (हिप्परगा, ता. औसा) : येथे ‘ड्राय डे’ दिवशी मद्यविक्री आणि गोवा बनावटीचे मद्य आढळल्याने कारवाई करण्यात आली. २) हॉटेल स्वप्नस्पर्श (आशिव, ता. औसा) : येथील तपासणीत गोवा राज्य निर्मित मद्य साठा सापडल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. ३) हॉटेल अतिथी (मोरतळवाडी, ता. उदगीर) : येथे ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले हाेते. त्यानुसार या हाॅटेलवर कारवाई केली. ४) हॉटेल राजदरबार (आशिव, ता. औसा) : येथे अवैध मद्य साठविल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
विशेष म्हणजे, काहींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध आयुक्तांकडे अपील केले होते. मात्र आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत, अपील फेटाळून लावले. या कठोर निर्णयामुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
नागरिकांसाठी टाेल-फ्री क्रमांक...
अवैध अथवा गोवा बनावटीच्या बनावट मद्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक (१८००२३३९९९९) अथवा व्हॉट्सॲप क्रमांकावर (८४२२००११३३) संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. - केशव राऊत, अधीक्षक, लातूर