Latur: अकस्मात मृत्यू नव्हे, तो खून होता! महिलेनेच नातेवाईकासह मिळून प्रियकराला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:25 IST2025-09-08T18:25:32+5:302025-09-08T18:25:43+5:30
मारहाण करून खून, मृतदेह फेकून दिला; उदगीरमध्ये एका महिलेसह नातेवाईकावर खुनाचा गुन्हा दाखल.

Latur: अकस्मात मृत्यू नव्हे, तो खून होता! महिलेनेच नातेवाईकासह मिळून प्रियकराला संपवलं
उदगीर : शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या एका महिलेने संगनमत करून शुक्रवारी रात्री जबर मारहाण करून एका इसमाचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर सदरील इसमाचा मृतदेह नेत्रगाव शिवारात टाकण्यात आला होता. सुरुवातीला याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. नंतर मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी तपास करून एका महिलेसह तिच्या नातेवाइकांची चौकशी केली असता दोघांनी मिळून खून केल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, मयत पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड (वय ४५, रा. डोंगरगाव ता . शिरूर अनंतपाळ ह.मु. समतानगर, उदगीर) याचे व आरोपी महिला सुनीता मधुकर पोरखे (रा. समतानगर) यांचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातूनच आरोपी महिलेने शुक्रवारी रात्री नातेवाईक अंबादास प्रकाश बिरादार (रा. येणकी ता. उदगीर) यास बोलावून घेऊन मयत पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड याला शुक्रवारी रात्री उशिरा जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह नेत्रगाव येथील शिवारात नेऊन टाकण्यात आला. सदरील घटना शनिवारी सकाळी आठ वाजता ग्रामीण पोलिसांना कळाल्यावरून त्यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
आकस्मात नंतर खुनाचा गुन्हा
पोलिसांनी चौकशी करून संशयित म्हणून सुनीता मधुकर पोरखे व अंबादास प्रकाश बिरादार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या चौकशीमध्ये त्यांनी मारहाण करून खून केल्याची कबूल केले. यानंतर मयताचे भाऊ हाणमंत कोंडीबा गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.