Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:32 IST2025-04-11T14:31:45+5:302025-04-11T14:32:13+5:30
या कारवाईत ११ किलो ३६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त झाला असून, त्याची किंमत १७ कोटींच्या घरात आहे.

Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत
चाकूर (जि. लातूर) : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील रोहिणा (ता. चाकूर) येथील डोंगराळ भागात अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमधून कारखाना मंगळवारी उद्ध्वस्त केला. या प्रकरणात आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना मुंबई येथून आणून गुरुवारी सकाळी चाकूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे न्यायाधीश विकास वाघमोडे यांनी दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या ७ झाली आहे. या कारवाईत ११ किलो ३६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त झाला असून, त्याची किंमत १७ कोटींच्या घरात आहे.
नांदगाव कारागृहात रवानगी
दिलावर अल्ताफ खान (वय ३२, रा. सांताक्रूझ मुंबई), वासिम शाहरात शेख (३४, रा. मीरा रोड, ठाणे) ही गुरुवारी कोठडी सुनावलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. यापूर्वी प्रमोद संजीव केंद्रे (३५, मूळ रा. रोहिणा, जि. लातूर, ह. मु. मीरा भाईंदर, मुंबई येथे पोलिस हवालदार), महंमद कलीम शेख (गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (५५, रा. रोहा, जि. रायगड), आहाद मेमन (मुंबई), अहमद अस्लम खान (मुंबई) या पाच जणांना अटक झाली होती. गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालय परिसरात मुंबई येथून आलेले आरोपींचे नातेवाईकही हजर होते. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी व पोलिसांनी आरोपींना एका कारमधून नांदगाव कारागृहाच्या दिशेने नेले. समवेत चार कार व पोलिसांचा ताफा होता.