Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:53 IST2025-07-26T11:50:23+5:302025-07-26T11:53:50+5:30
या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी चारजण ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे

Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली
धाराशिव/औसा (जि. लातूर) : एचआयव्ही बाधित १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ढोकी पोलिसांत सहाजणांविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. दरम्यान, हे प्रकरण औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, चौघांना ताब्यात घेतले आहे.
मूळची धाराशिव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, तिच्यावर लातूरजवळील आम्ही सेवक संस्थेच्या सेवालय प्रकल्पातील अमित महामुनी याने अत्याचार केला. याबाबतची तक्रार संस्थेच्या तक्रार पेटीमध्ये टाकल्यानंतर तेथील कर्मचारी पूजा वाघमारे व राणी यांनी ती तक्रार चिठ्ठी फाडून टाकली. याच दरम्यान ती मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली. हा प्रकार संस्थाचालक रवी बापटले, अधीक्षक रचना बापटले यांना सांगण्यात आला होता, असा दावा फिर्यादीने केला आहे. त्यानंतरही कायदेशीर कारवाई न करता ममता हॉस्पिटल येथे फिर्यादीचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना कोणाला सांगितली तर आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशी धमकी देत महामुनी याने वारंवार अत्याचार केल्याचा जबाब फिर्यादीने दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचाराचा आरोप असलेला अमित महामुनी तसेच संस्थेचे प्रमुख रवी बापटले, अधीक्षक रचना रवी बापटले, पूजा वाघमारे आणि राणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संस्थेच्या बदनामीचा डाव
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांनी सांगितले, हे संपूर्ण प्रकरण संस्थेला बदनाम करण्यासाठी पुढे आणले आहे. मुळात ज्याने अत्याचार केला, अशी तक्रार आहे तो अमित महामुनी संस्थेचा कर्मचारी नाही. महामुनी आणि त्या मुलीची संस्थेमध्ये भेट झालेली नाही. यापूर्वीही एचआयव्ही बाधितांचा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी मला मारहाण झाली, मोठी कटकारस्थाने झाली. मुलांना शाळांमध्ये प्रवेश नाकारला होता, अनेकांचा प्रकल्पाला विरोध होता. त्यातूनच या घटनेला कलाटणी दिली जात आहे. कोणावर अत्याचार झाला असेल तर आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आम्ही पोलिसांना सहकार्य करू.