Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात
By राजकुमार जोंधळे | Updated: March 23, 2024 23:55 IST2024-03-23T23:55:04+5:302024-03-23T23:55:18+5:30
Latur News: निलंगा येथील एमआयडीसीत एका गाेदाम परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले.

Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात
- राजकुमार जाेंधळे
लातूर - निलंगा येथील एमआयडीसीत एका गाेदाम परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
निलंगा येथील एमआयडीसीमध्ये लातूर येथील व्यापाऱ्यांच्या जागेवर वेअरहाऊसचे बांधकाम सुरू आहे. लगत वाळलेले गवत आणि झाडे असून, त्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. काही वेळात या आगीने राैद्र रूप धारण केले. परिणामी, परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती निलंगा पाेलिसांना दिली. शिवाय, शिक्षक डी. के. सूर्यवंशी आणि संजय पेटकर यांनीही याची माहिती नगरपरिषदेला दिली. माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे हे अग्निशामक दलाच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्याचबराेबर पोलिस निरीक्षक बी. आर. शेजाळ, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप राठोड, उमाकांत सूर्यवंशी हेही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या बंबमुळे ही आग आटाेक्यात आणण्यात यश आले. यातून परिसरातील मोठे नुकसान टळले आहे. या वेअरहाऊसलगतच अग्रवाल यांची डाळमिल असून, त्यामध्ये जवळपास दीड कोटीचा माल आहे. त्याच्यालगत गॅस सिलिंडरचे गाेदाम आहे. ही आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे माेठा अनर्थ टळला आहे. वेअरहाऊस रिकामे असल्याने नुकसान झाले नाही.
आग आटाेक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे गंगाधर खरवडे, विशाल सांडूर, लक्ष्मण खराडे, नागेश तुरे, आदी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शनिवारी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आग आटाेक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू हाेते. त्यांना परिसरातील नागरिक रितेश ईनानी, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, पंत नाईक, आदींसह नागरिकांनी मदत केली.