Latur Crime Latest: चाकूर तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्रात सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. रविवारी सांयकाळी ही घटना समोर आली. सुटकेसमधील मृतदेह २५-३० वयोगटातील महिलेचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेळगाव शिवारात ही घटना घडली आहे. तिरू नदीवर चाकूर आणि वाढवणाला जोडणारा पूल आहे. रविवारी (२४ ऑगस्ट) चार वाजेच्या सुमारास परिसरात दुर्गंधीचा उग्र वास येऊ लागला. शेतकऱ्यांनी याची माहिती पोलीस ठाण्यात कळवली.
नदी काठावर दिसली सुटकेस
वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्यासह पोलिसांचे पथक परिसरात आले. त्यांनी वास येत असलेल्या परिसरात झाडाझडती घेतली, तेव्हा नदीकाठावर एक सुटकेस दिसली.
त्यानंतर सुटकेस उघडण्यात आली, असता त्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. हे दृश्य बघून सगळेच हादरले. त्यानंतर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह आणखी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी चापोली येथील आरोग्य केंद्रात पाठवला. सुटकेसमध्ये आढळून आलेल्या महिलेचे वय २५ ते ३० वर्ष दरम्यान आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही महिला कोण आणि तिचा खून का करण्यात आला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नदीवर असलेल्या पुलावरूनच महिलेचा मृतदेह असलेली सुटकेस फेकून दिली गेली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.