Latur: घरकुलाच्या हप्त्यासाठी २५ हजारांची लाच घेतली; अभियंत्यासह एजंट ACB च्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:48 IST2025-12-12T12:47:59+5:302025-12-12T12:48:17+5:30
लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शिरूर अनंतपाळ येथे कारवाई

Latur: घरकुलाच्या हप्त्यासाठी २५ हजारांची लाच घेतली; अभियंत्यासह एजंट ACB च्या ताब्यात
लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळा कारवाईत पंचायत समिती शिरुर अनंतपाळ येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह खाजगी इसमाला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी रंगेहाथ पकडले
तक्रारदाराने १० डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत, स्वतःच्या व भावाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. पडताळणीदरम्यान अन्वर आयुब शेख (वय ३१), ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी लाचेची मागणी करीत २५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ डिसेंबरला आरिमोड, शिरुर अनंतपाळ येथे सापळा रचण्यात आला. त्यात आरोपी अन्वर शेख यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम चाँद नवाज पटेल यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
अंगझडतीत चाँद नवाज पटेलकडून लाच रक्कम व मोबाईल तर अन्वर शेखकडून मोबाईल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.