शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:18+5:302021-06-23T04:14:18+5:30
किनगाव जि.प. प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते दहावी वर्गाचे ३०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेत ...

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला अडथळा
किनगाव जि.प. प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते दहावी वर्गाचे ३०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेत संच मान्यतेनुसार एकूण १५ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ११ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून, चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. प्रशालेला वर्ग २ मुख्याध्यापक पद मंजूर असून, शाळेचा कार्यभार प्रभारी मुख्याध्यापकावरच आहे. माध्यमिक शिक्षकांची तीन पदे मंजूर असून, दोन शिक्षक कार्यरत आहेत. एक भाषा व सामाजिक शास्त्र विषयांचे शिक्षक पद रिक्त आहे. प्राथमिक पदवीधर तीन पदे मंजूर असून, दोन शिक्षक कार्यरत आहेत. एक पद रिक्त आहे. प्राथमिक शिक्षकांची पाच पदे मंजूर असून, चार शिक्षक कार्यरत आहेत. तर एक शिक्षकांची जागा रिक्त आहे. मार्चमध्ये एक शिक्षक, मेमध्ये एक शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. एप्रिलमध्ये एका शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. यापूर्वीचे प्रभारी मुख्याध्यापक पद हे विज्ञान विषयाच्या शिक्षकाकडे होते; पण विज्ञान विषयाचे शिक्षक पदोन्नतीने बदलून गेल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषयापासून वंचित राहावे लागत आहे, तसेच मराठी व शारीरिक शिक्षणाचा शिक्षकही सेवानिवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांना मातृभाषेपासून दूर राहावे लागत आहेत. तर खेळाचे धडे देणाऱ्या शिक्षकाचे पद रिक्त झाल्याने विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे.
रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा.
शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन बैठकीमध्ये शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, असा ठराव घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. शिक्षकांचे रिक्त पदे लवकरात लवकर भरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. - करणसिंग ठाकूर
अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती
प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे शिक्षकांच्या रिक्त जागेचा अहवाल सादर केला असून, शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक सुभाष गव्हांडे यांनी सांगितले.