लातूर जिल्ह्यासह परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड अपुरे पडत आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रेल्वेने अनेक कोचचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर केलेले आहे. असे ४८२ कोच मुंबई येथे तयार आहेत. एका कोचमध्ये १६ रुग्णांवर उपचार होऊ शकतात. यापैकी किमान ३६ कोच लातूर येथे पाठवले तर एकूण ५७६ रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
रेल्वेने तयार केलेल्या कोचमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी ते फायद्याचे ठरणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने हे कोच पाठवून द्यावेत. शिवाय अत्यवस्थ रुग्णांसाठी पंतप्रधान साहाय्यता निधीतून १०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत. लातूरच्या रेल्वे स्थानकावर अद्ययावत सुविधा आहेत. सरकारने कोच, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन उपलब्ध करून दिले तर हजारो रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या मागणीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निजाम शेख यांनी केली आहे.