खाशाबा जाधव राज्य स्पर्धेसाठी आखाड्याबाहेर कुस्ती; लातूरला यजमानपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 07:49 PM2024-01-13T19:49:41+5:302024-01-13T19:49:53+5:30

दोन संघटनांमुळे क्रीडा विभाग कचाट्यात

Khashaba Jadhav wrestles outside arena for state tournament; Host to Latur | खाशाबा जाधव राज्य स्पर्धेसाठी आखाड्याबाहेर कुस्ती; लातूरला यजमानपद

खाशाबा जाधव राज्य स्पर्धेसाठी आखाड्याबाहेर कुस्ती; लातूरला यजमानपद

-महेश पाळणे

लातूर : दोन तपानंतर लातुरात होणाऱ्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी दोघ संघटनांतील वादामुळे क्रीडा विभाग चक्रावला आहे. परिणामी, या स्पर्धेची अद्यापही पूर्व बैठक झाली नाही. त्यामुळे तारखेचाही प्रश्न आहे. एकंदरित, या स्पर्धेसाठी आखाड्याबाहेरच कुस्ती सुरु असल्याची चर्चा मल्लांतून होत आहे.

राज्य शासनामार्फत खेळाला चालना मिळण्यासाठी तसेच युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी कुस्तीसह व्हॉलिबॉल, खो-खो व कबड्डी स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी प्रत्येकी ७५ लाखांचा निधी दिला जातो. यंदाचे कुस्ती स्पर्धेेचे यजमानपद लातूरला मिळाले असून स्पर्धेच्या तयारीसाठी क्रीडा विभाग मात्र कोणत्या कुस्ती संघटनेकडून तांत्रिक सहाय्य घ्यावे, यासाठी थेट क्रीडा आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे कुस्ती शौकिनांना ही स्पर्धा कधी होणार याची उत्सुकता लागली आहे. एकंदरित, दोन तपानंतर होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सन २००० नंतर असा योग...
१९९९- २००० साली लातुरात खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा झाली होती. तत्पूर्वी १९६९ साली लातुरात महाराष्ट्र केसरी स्पर्धाही पार पडली होती. साधारणत: दोन तपानंतर पुन्हा मोठ्या कुस्ती स्पर्धेचा योग आला आहे. मात्र, संघटनेतील दुफळीमुळे क्रीडा विभागही आयोजनासाठी बुचकळ्यात पडला आहे. लातुरात झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी त्या काळी २५ लाखांच्या जवळपास अनुदान होते. त्यानंतर अनुदानात वाढ होऊन ५० लाख करण्यात आले. आता मात्र या स्पर्धेसाठी ७५ लाख रुपये अनुदान करण्यात आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा भारदस्त होईल.

३५ लाखांचे खेळाडूंना रोख बक्षिस...
या स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीकोरोमन व महिला गटात होणार असून प्रत्येकी गटात ११ लाख ७५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मल्लांना मिळणार आहे. तिन्ही गटात मिळून ३५ लाख २५ हजार रुपये अशी रक्कम खेळाडूंच्या खात्यात पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व आहे. यासह तिन्ही गटातील विजेते, उपविजेत्यांना चषक व पदक देऊन गौरविण्यात येते. या कारणाने या स्पर्धेचे आकर्षण मल्लांना आहे.

कबड्डी स्पर्धा गेली लातूरहून ठाण्याला...
पूर्वी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसह छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूरला देण्यात आली होती. मात्र, त्यात बदल करुन कुस्ती स्पर्धा लातूरलाच देण्यात आली असून कबड्डी स्पर्धा मात्र ठाणे जिल्ह्याला देण्यात आली आहे. यासह छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाण्याला तर भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे यजमानपद सांगली जिल्ह्याला देण्यात आले आहे.

आयुक्तांकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा...
खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा लातूर जिल्ह्यातच होणार असून या स्पर्धेसाठी कोणत्या संघटनेकडून तांत्रिक सहाय्य घ्यावे, यासाठी क्रीडा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यांचे मार्गदर्शन येताच बैठक घेऊन तारीख निश्चित केली जाणार आहे.- जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी.

Web Title: Khashaba Jadhav wrestles outside arena for state tournament; Host to Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर