आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जेलभरो, 400 कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 22:59 IST2018-08-20T22:58:47+5:302018-08-20T22:59:26+5:30
मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जेलभरो, 400 कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका
निलंगा : मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी चारशे कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. मात्र, काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
आरक्षण नसल्यामुळे समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. सच्चर समिती अहवालाच्या अंमलबजावणीकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हा समाज मागास राहिला आहे. समाजाला आरक्षण, शिक्षण, संरक्षण देणे गरजेचे आहे, असे निवेदन यावेळी देण्यात आले. दरम्यान, आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अभय साळुंके, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. लालासाहेब देशमुख, धनगर आरक्षण मोर्चाचे गोविंद शिंगाडे, झटिंगराव म्हेत्रे यांनी पाठिंबा दिला.
आंदोलनात लातूरचे मोहसीन खान, महंमद अली यांनी सच्चर समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीची मागणी केली. आंदोलना दरम्यान समाजातील व्यापारी, हातगाडेधारकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी सद्भावना दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर यांनी आंदोलनस्थळी एकतेची शपथ दिली. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनाना मुस्लीम समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोनंतर अटक करवून घेतली.