ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदींची तपासणी; तिसऱ्या टप्प्यात ११६ पथकांमार्फत पडताळणी
By हरी मोकाशे | Updated: November 10, 2023 21:11 IST2023-11-10T21:11:08+5:302023-11-10T21:11:21+5:30
जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचा जिल्हा प्रशासनाकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे

ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदींची तपासणी; तिसऱ्या टप्प्यात ११६ पथकांमार्फत पडताळणी
लातूर : जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये १९६७ पूर्वीची अभिलेखे पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी ११६ पथकामार्फत अभिलेखांची तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचा जिल्हा प्रशासनाकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १० तालुक्यांतील ७८६ ग्रामपंचायतीत सन १९४८ पासूनच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यावेळी ग्रामपंचायती अस्तित्वात नसल्याने तेव्हाच्या कुठल्याही नोंदी आढळल्या नाहीत. दरम्यान, सन १९६० ते १९६७ या कालावधीतील जन्म-मृत्यूच्या नोंदी आढळून येत आहेत. आतापर्यंत जवळपास दहा हजार नोंदी तपासण्यात आल्या आहेत.
जवळपास १० हजार नोंदींची तपासणी...
शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी ग्रामपंचायतीतील जन्म-मृत्यूच्या नोंदींची पडताळणी केली. या तपासणीसाठी ११६ पथक होते. आणखीन नोंदी पडताळणीचे काम सुरू असल्याचे डेप्युटी सीईओ दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.