खाद्यतेलाच्या दरवाढीने फोडणीला महागाईचा बसतोय तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:38+5:302021-06-17T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य हैराण झाले असतानाच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने मोठे संकट निर्माण झाले ...

खाद्यतेलाच्या दरवाढीने फोडणीला महागाईचा बसतोय तडका
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य हैराण झाले असतानाच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने मोठे संकट निर्माण झाले आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फोडणीला महागाईचा तडका बसत आहे. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरातही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोराेनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गोरगरीब आर्थिक संकटात सापडले. दरम्यान, इंधनाच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम माल वाहतुकीच्या दरावर झाला आहे. याशिवाय, खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वीट मार्ट, बेकरी, हॉटेल आणि खानावळीतील खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या २० ते ३० टक्क्यांनी हे दर वाढले आहेत.
आठ महिन्यांपूर्वी फरसाण २०० रुपये किलो दराने मिळत होते, ते आता २४० रुपये दराने मिळत आहे. शेवच्या दरात ५० रुपयांनी वाढ होऊन २५० रुपये किलो दराने ती मिळत आहे. बाकरवडीच्या दरात २५ रुपये, पापडीच्या दरात २५ रुपये, जिलेबीच्या दरात २० रुपये, चिप्सच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलालाच महागाईची फोडणी बसली आहे. खाद्यतेलाचे दर वाढल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालेभाज्यांबरोबर आता कडधान्ये व डाळींचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे.
१५ किलोच्या तेल डब्यासाठी २०० रुपये ज्यादा...
एप्रिलच्या तुलनेत सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या १५ किलोच्या डब्यासाठी आता २०० ते २५० रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत. बहुतांश कुटुंबांमध्ये सूर्यफुल व सोयाबीनच्या तेलाचा वापर केला जातो. भाजीची फोडणी ही तेलावर अवलंबून असते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
कोरोना काळातच दरवाढ...
काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये काही दुकानदारांकडून ग्राहकांना ज्यादा दराने किराणा साहित्याची विक्री करण्यात आली. त्यात प्रामुख्याने खाद्यतेल, डाळ, शेंगदाणा आदींचा समावेश होता. डाळी महागल्या तर पालेभाज्यांचा पर्याय आहे. परंतु, खाद्यतेलाशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. कोरोना काळात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांची चव महागली...
वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. लज्जतदार आणि चटकदार पदार्थांचे दर वाढले आहेत. फरसाण, शेव, बाकरवडी, पापडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची चव महागली आहे. कुटुंबात खाद्यतेलाचा कमीत कमी वापर करण्यात येत आहे.
खाद्यतेलाच्या किमती वाढल्या...
एप्रिलमध्ये सूर्यफुलाच्या १५ किलोच्या डब्याला २७६०, सोयाबीन २२४०, शेंगदाणा तेलाला २७४० रुपये मोजावे लागत होते. जूनमध्ये सूर्यफुलाच्या डब्याला २६९०, सोयाबीनच्या २४५०, शेंगदाणा तेलासाठी २७०० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच बाजारपेठेत तूरडाळ १०० रुपये प्रतिकिलो, मूगडाळ १०० रुपये, मसूरडाळ ७५ रुपये, उडीदडाळ १०० रुपये, चणाडाळीची ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.