'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी
By हरी मोकाशे | Updated: June 12, 2024 18:11 IST2024-06-12T18:08:31+5:302024-06-12T18:11:04+5:30
कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी
लातूर : मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहिला. तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होत होती. परिणामी, जलस्त्रोत कोरडे पडत होते तर जलसाठे आटू लागले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या अखेरीस भूजल पातळी २.६७ मीटरने खालावली होती. पावसाळा कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागून होते.
प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)
तावरजा - ००
रेणापूर - २१.१७
व्हटी - ००
तिरु - ००
देवर्जन - २.८९
साकोळ - ३.११
घरणी - २.५७
मसलगा - ४५.५०
एकूण - ९.६३
मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...
मृगास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सतत कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे तहानलेल्या प्रकल्पांना लाभ होत आहे. पाच दिवसांमध्ये रेणापूर मध्यम प्रकल्पात १९.५१ टक्के, घरणी प्रकल्पात २.५७ टक्के तर मसलगा प्रकल्पात ३४.४४ टक्के जलसाठा वाढला आहे. सर्वाधिक पाणीसाठा निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात झाला आहे.
१० दलघमीने वाढले पाणी...
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. शुक्रवारी एकूण १५.४९० दलघमी पाणीसाठा होता. आता २५.३१६ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत ९.८२६ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाण्याचा प्रश्न कमी होणार...
तीव्र उन्हामुळे यंदा ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय, ३८९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पाऊस होत असल्याने मध्यम प्रकल्पात पाणी वाढत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.