जळकाेट येथे गत अनेक दिवसांपासून मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न प्रलंबित हाेता. यातून १०० मुलींच्या निवासाची व्यवस्था असलेल्या वसतिगृहाला मान्यता मिळाली. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता नवी वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सदर इमारतीच्या उद्घाटनाला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. या वसतिगृहाचे तातडीने उद्घाटन करावे, अशी मागणी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने हाेत आहे. यातून मागासवर्गीय मुलींच्या निवास, शिक्षणाची व्यवस्था हाेणार आहे. जळकाेट येथे जवळपास दहा काेटी रुपयांच्या निधीतून हे वसतिगृह उभारण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून समाजकल्याण विभागाच्या वतीने तत्कालीन समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आणि समाजकल्याण विभागाचे लातूर येथील सहायक आयुक्त अरावत यांनी पुढाकार घेत ही इमारत उभी केली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करा...
जळकाेट येथील वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावाे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरुन चालताही येणार नाही. परिणामी, उद्घाटनापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याबाबत समाजकल्याण विभागाशी संपर्क साधला असता, लवकरच या इमारतीचा लाेकार्पण साेहळा आयाेजित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.