एका घरफोडीचा उलगडा होण्यापूर्वीच हिप्पळगावात पुन्हा दिवसाढवळ्या घर फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:15 IST2023-01-31T19:12:19+5:302023-01-31T19:15:05+5:30
एकाच आठवड्यात घर फाेडण्याची ही दुसरी घटना आहे, स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.

एका घरफोडीचा उलगडा होण्यापूर्वीच हिप्पळगावात पुन्हा दिवसाढवळ्या घर फोडले
येरोळ (जि. लातूर) : शिरूर आनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील घरफाेडीचा तपास लागण्यापूर्वीच हिप्पळगाव येथी एका शिक्षकाचे चाेरट्यांनी घर फाेडले असून, साेन्याचे दागिने, राेख ३५ हजार रुपये असा एकूण २ लाख ५९ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात घर फाेडण्याची ही दुसरी घटना आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
पाेलिसांनी सांगितले, हिप्पळगाव येथील शिक्षक विक्रम बालाजी खांडेकर (वय ५७) यांचे घर चाेरट्यांनी दिवसाढवळ्या सकाळी फाेडले. ही घटना २८ जानेवारी रोजी घडली असून, दाराचे लोखंडी कुलूप तोडून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. खाेलीतील लोखंडी कपाटाचे दार ताेडून पाच तोळे सहा ग्रॅम साेन्याचे दागिने (किंमत २ लाख २४ हजार) आणि रोख ३५ हजार असा एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गत आठ दिवसांपूर्वीच येराेळ येथील शेतकरी संगमेश्वर साकोळकर यांचे घर चाेरट्यांनी फाेडले हाेते.
घरातील पाच तोळे सोने आणि रोख १० हजार असा ऐवज लंपस केला आहे. या घरफाेडीचा उलगडा हाेण्यापूर्वीच पुन्हा हिपळगाव येथे दिवसाढवळ्या घर फाेडल्याची घटना घडली. परिणामी, स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. याबाबत शिरूर आनंतपाळ पोलिस ठाण्यात गुरनं. २१/ २०२३ कलम ४५४ / ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.