मराठवाड्यासाठी महत्वाचे; लातूर ते मुंबई प्रवास ५ तासांत; नव्या महामार्गावर मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:45 IST2025-12-12T15:40:26+5:302025-12-12T15:45:01+5:30
राज्य मार्ग विकास महामंडळ यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे.

मराठवाड्यासाठी महत्वाचे; लातूर ते मुंबई प्रवास ५ तासांत; नव्या महामार्गावर मुख्यमंत्र्यांची माहिती
लातूर : लातूर ते मुंबई प्रवास केवळ पाच तासांत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने ही मोठी पायाभूत झेप मानली जात आहे. यासंदर्भातील प्राथमिक आराखडा मुख्यमंत्र्यांनी उघड केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कल्याण- लातूर द्रुतगती महामार्ग उभारण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. राज्य मार्ग विकास महामंडळ यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. हा महामार्ग साकारल्यास लातूर- मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ सध्याच्या १० ते ११ तासांवरून थेट ४ ते ५ तासांपर्यंत कमी होणार आहे.
या महामार्गासाठी भूसंपादन, खरेदी, रस्ता आखणी, पर्यावरणीय परवानग्या आणि निधीची तरतूद या महत्त्वाच्या टप्प्यांचे काम पुढील काळात गतीने पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्प अद्याप नियोजनाच्या प्राथमिक टप्प्यात असला तरी, पूर्णत्वास गेल्यावर मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या नेटवर्कमध्ये शक्तिपीठ महामार्ग, नागपूर-गोवा एक्स्प्रेसवे, तसेच समृद्धी महामार्ग यासारख्या द्रुतगती मार्गांचा समावेश असून, या विस्तृत जाळ्यात लातूरची धोरणात्मक जोडणी अधिक मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लातूर- मुंबई दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक, वेगवान आणि सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.