पाेलिस असल्याची बतावणी; भामट्यांनी ज्येष्ठाला गंडविले
By राजकुमार जोंधळे | Updated: September 26, 2023 21:38 IST2023-09-26T21:38:30+5:302023-09-26T21:38:35+5:30
अहमदपुरातील घटना : दिवसाढवळ्या लुबाडले...

पाेलिस असल्याची बतावणी; भामट्यांनी ज्येष्ठाला गंडविले
लातूर : आम्ही पाेलिस आहाेत, अशी बतावणी करून दाेघा भामट्यांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला गंडविल्याची घटना अहमदपूर शहरात दिवसाढवळ्या मंगळवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, माधव नामदेव नंदवंशी (वय ७१, रा. हनुमान टेकडी, अहमदपूर) हे अहमदपूर शहरातील थाेडगा काॅर्नर येथे आले असता, दाेघा भामट्यांनी त्यांचा पाठलाग करत आम्ही पाेलिस आहाेत? पुढे काही तरी विपरीत घटना घडत आहे. स्वत:जवळील साेन्याचे दागिने व्यवस्थित ठेवा, असे म्हणून हातचलाखी करत त्यांच्याकडील साेन्याची साखळी (किंमत ७० हजार रुपये) पळविली. याबाबत सेवानिवृत्त कर्मचारी माधव नंदवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाेघा अज्ञात भामट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.