साखरेपेक्षा गूळच खातोय भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:49+5:302021-06-25T04:15:49+5:30
गोड पदार्थांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर केला जातो. गूळ हा शरीरासाठी आरोग्यदायी मानला जातो. हे दोन्ही ...

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव !
गोड पदार्थांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर केला जातो. गूळ हा शरीरासाठी आरोग्यदायी मानला जातो. हे दोन्ही पदार्थ उसाच्या रसापासून तयार केले जातात. गुळामध्ये व्हिटॅमिन, लोह, ग्लुकोजसह इतर घटक असतात. तसेच शरीरासाठी पौष्टिक म्हणूनही गुळाला ओळखले जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी होत आहे. त्यातच मागील वीस वर्षांत साखरेपेक्षा कमी भावाने विकला जाणारा गूळ सद्यस्थितीत अधिक दराने विकला जात आहे. २००० मध्ये गूळ १८ रुपये, तर साखर २४ रुपये, २००५ मध्ये गूळ २४, तर साखर २९, २०१० मध्ये गूळ २८, तर साखर ३१, २०२० मध्ये गूळ ३०, तर साखर ३२ रुपये किलो दराने मिळत होती; तर २०२१ या वर्षांमध्ये साखर २५, तर गुळाचा दर ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. यामध्ये सेंद्रिय गुळाला सर्वाधिक पसंती दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनामुळे प्रत्येकाला निरोगी आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यामुळे साखरेपेक्षा शरीरासाठी उपयुक्त असलेल्या गुळालाचा मागणी असल्याचे चित्र आहे.
प्रकृतीसाठी गूळ चांगला...
आरोग्यासाठी गूळ हा फायदेशीर आहे. गुळात व्हिटॅमिन, लोह, ग्लुकोजसह इतर घटक असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात गुळाचा वापर वाढला असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.
साखरेपेक्षा गुळाला ग्राहकांची मागणी...
कोरोनामुळे अनेक नागरिक व्यायाम, योगा करीत आहेत. त्यामुळे साखरेची मागणी घटली असून, गुळाला पसंती आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत गुळाला मागणी वाढल्याचे चित्र आहे.
- अमरीश पाटील, किराणा व्यापारी.
मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यातच अनेकांना मधुमेहाची भीती वाटते. त्यामुळे गुळाच्या चहाला पसंती वाढत आहे. परिणामी, नागरिक साखरेऐवजी गूळ खरेदीला पसंती देत आहेत.
- महेश पाटील, किराणा व्यापारी.
सेंद्रिय गूळ, केमिकलयुक्त गूळ विक्री केला जातो. मात्र, नागरिकांची सेंद्रिय गुळाला पसंती आहे. ग्रामीण भागात चहाला जास्त मागणी असल्याने गूळ कमी, तर साखरेची जास्त विक्री होते.
- अनिल वाघमारे, किराणा व्यापारी, हरंगुळ बु.
गुळाच्या चहाला नागरिकांची पसंती...
सध्या शहरातील अनेक भागातील चहा टपरीवर गुळाचा चहा उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी स्पेशल गुळाचा चहा मिळेल... म्हणून फलक लागल्याचे चित्र आहे.
गुळाचा चहा चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. शहरात अनेकांनी गुळाचा चहा विक्रीचे स्टॉल लावल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
गुळामुळे अशक्तपणा कमी होतो, शरीराला पुरेशी उष्णता मिळते, पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यात मदत होते, असे मत शहरातील आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले.