मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 21:50 IST2024-09-26T21:46:32+5:302024-09-26T21:50:38+5:30
Maratha reservation : खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक
अहमदपूर (जि. लातूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सहा वेळा उपोषण केले. मात्र, शासनाने दखल घेतली नाही आणि आरक्षणही दिले नाही. या नैराश्यातून तालुक्यातील हासरणी येथील एका पती - पत्नीने बुधवारी रात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ज्ञानोबा मारोती तिडोळे (३८), चंचलाबाई ज्ञानोबा तिडोळे (३४, रा. हासरणी, ता. अहमदपूर) असे विषारी द्रव घेतलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पाचवेळा उपोषण केले. १७ सप्टेंबरपासून सहाव्यांदा उपोषणास सुरुवात केली होती. त्यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील हंगरगा येथील जयराम पवार यांनीही अहमदपुरात बेमुदत उपोषण सुरू केले होते.
या उपोषणात ज्ञानोबा तिडोळे सहभागी झाले होते. बुधवारी सायंकाळी जरांगे-पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची माहिती समजली. तेव्हा सहावेळा उपोषण करूनही सरकारने दखल घेतली नाही. तसेच मराठा आरक्षण दिले नाही. त्यामुळे नैराश्यात आलेल्या ज्ञानोबा तिडोळे व त्यांची पत्नी चंचलाबाई तिडोळे यांनी विषारी द्रव घेतले.
आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोत
आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने आपल्या अकरावीतील मुलीचे व दोन लहान मुलांचे आता कसे होईल, या नैराश्यातून ज्ञानोबा तिडोळे यांनी आपली बहीण इंदुबाई तुकाराम हेंडगे, चुलत भाऊ व इतर नातेवाइकांना फोन केला. आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोत, असे सांगून या पती-पत्नीने बुधवारी रात्री ८:३० वा.च्या सुमारास विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांना वेळीच येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.