HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:11 IST2025-02-20T19:10:21+5:302025-02-20T19:11:07+5:30
सैन्यदलात जवान असलेले वडील सुटीवर आले होते गावी

HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथील रहिवाशी तथा सैन्यदलातील जवान संभाजी मारुती तांदळे यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कोळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, वडिलांच्या निधनाचे दु:ख उराशी बाळगत मुलगा महेश याने गुरुवारी किनगाव येथील केंद्रावर बारावी रसायनशास्त्राचा पेपर दिला.
कोळवाडी येथील जवान संभाजी मारूती तांदळे (वय ४५) हे भारतीय जवान २ मराठा बटालियन टेंगा, अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते. एक महिन्याच्या सुट्टीवर आपल्या पत्नीसह ते गावी आले होते. तर मुलगा महेश किनगाव येथील श्री संत मोतीराम महाराज महाविद्यालयात बारावी विज्ञान वर्गात शिक्षण घेत असल्याने तो गावी राहत होता. दरम्यान, बुधवारी सकाळी जवान संभाजी तांदळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा महेश याने मुखाग्नी दिला. दरम्यान, महेशचा गुरुवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. वडिलांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही चुलते बाळू तांदळे यांनी त्यास धीर दिला. त्यानंतर महेशने किनगाव येथील मल्हारराव होळकर आश्रम शाळेतील केंद्रावर पेपर दिला.
दु:ख बाजुला सारुन दिली परीक्षा...
मी जेईई परीक्षेची तयारी करीत असून, वडिलांचे निधन झाल्याचे दुःख मोठे आहे. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही चुलत्यांनी व शिक्षकांनी धीर दिला. त्यामुळे परीक्षेला सामोरे गेलो. - महेश तांदळे