गुणवत्ता वाढणार तरी कशी? ‘झेडपी’ शाळांना गुरुजींच्या रिक्त जागांचे ग्रहण !
By संदीप शिंदे | Updated: September 26, 2022 19:19 IST2022-09-26T19:19:25+5:302022-09-26T19:19:40+5:30
लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत.

गुणवत्ता वाढणार तरी कशी? ‘झेडपी’ शाळांना गुरुजींच्या रिक्त जागांचे ग्रहण !
लातूर : आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, शिक्षक भरतीअभावी रिक्त जागांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लातूर तालुक्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, सहशिक्षकांच्या ८४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवेतील शिक्षकांवर ताण वाढत असून, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.
लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत. त्यापैकी ८०७ जागा भरलेल्या असून, ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये विस्तार अधिकारी १, केंद्रप्रमुख ९, मुख्याध्यापक १६, प्राथमिक पदवीधर शिक्षक १७, सहशिक्षक ३५, माध्यमिक शिक्षक २, कनिष्ठ सहायक १ आणि परिचर यांच्या ३ जागा रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिक्त पदे शासनाकडून भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवरच इतर विषय शिकविण्याची जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे जागा रिक्त असतानाही जि. प. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त पदांचा अहवाल शून्य कळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी जि. प.ची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे आता पदोन्नती करूनच रिक्त पदांचा अहवाल कळविला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
सहशिक्षकांची ३५ पदांना मुहूर्त मिळेना...
दगडवाडी, कानडी बोरगाव, चिंचोली ब., गोंदेगाव, पाखरसांगवी, जेवळी, दिंडेगाव, गांजूर, वांजरखेडा, साखरा, भोसा, तांदुळवाडी, बोरी, ढोकीह, कव्हा, सामनगाव, चव्हाणवाडी, भोयरा, भातखेडा, खंडापूर, गंगापूर, भातांगळी, चिकलठाणा, गुंफावाडी, कोळपा, बोरवटी चाटा आदी गावातील जि.प. शाळेत ३५ सहशिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी मुहूर्त मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
१६ शाळांवर मुख्याध्यापकच नाही...
लातूर तालुक्यामध्ये १६५ जि.प.शाळा असून, यामध्ये १५९ प्राथमिक तर ६ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. जवळपास १६ शाळांवर मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहे. तर चिंचोली ब. येथे विस्तार अधिकारी, बाभळगाव, महमदापुर, गातेगाव, हरंगुळ बु., वासनगाव, कासारखेडा, शिराळा आदी ठिकाणी केंद्रप्रमुखांची ९ पदे तर इतर १६ शाळांमध्ये १७ प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु...
लातूर तालुक्यामध्ये १६५ जि.प. शाळा असून, यामध्ये माध्यमिकच्या ६ शाळांचा समावेश आहेत. विविध संवर्गातील ८४ पदे रिक्त असून, या जागेवर नेमणुका देण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार लवकरच अंमलबजावणी होईल. रिक्त पदांचा अहवालही वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी सांगितले.