लातूरचे हेमंत कोटलवार फिनलँडचे राजदूत, मराठवाड्याला मिळाला पुन्हा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 21:28 IST2023-12-26T21:27:45+5:302023-12-26T21:28:09+5:30
राजदूत म्हणून नियुक्त झालेले ते मराठवाड्यातील पहिले अधिकारी ठरले.

लातूरचे हेमंत कोटलवार फिनलँडचे राजदूत, मराठवाड्याला मिळाला पुन्हा बहुमान
लातूर :लातूरचे हेमंत हरिश्चंद्र कोटलवार यांची फिनलँड येथे भारताचे राजदूत म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील, असे मंत्रालयाच्या माध्यम विभागाने म्हटले आहे.
कोटलवार हे सध्या युरोपमधील चेक रिपब्लिकचे राजदूत म्हणून कार्यरत असून, पुन्हा एकदा मराठवाड्याला बहुमान मिळाला आहे. हेमंत कोटलवार हे १९९६ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असून, त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून विविध देशांमध्ये सक्षम भूमिका बजावली आहे. राजदूत म्हणून नियुक्त झालेले ते मराठवाड्यातील पहिले अधिकारी ठरले.
सौदी अरेबिया आणि यमेनच्या युद्धात अडकून पडलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या यशस्वी सुटकेसाठी त्यांनी मध्यस्थी केली होती. लडाख प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
भारतात पासपोर्ट वितरणाची ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यामध्ये त्यांचा सहभाग राहिला. राजदूत हेमंत कोटलवार हे लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कोटलवार व रजनी कोटलवार यांचे पुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथे झालेले आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली.