राजकुमार जोंधळे, लातूरLatur Weather: लातूर शहर आणि परिसरात मंगळवारी (२७ मे) दुपारी सव्वादोन ते सव्वाचार दरम्यान धो-धो पाऊस झाला. मुख्य रस्त्यांसह प्रत्येक मार्ग जलमय झाला. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेग इतका होता की, अनेक दुचाकी वाह लागल्या होत्या. काही ठिकाणी चारचाकी वाहने जिथल्या तिथे थांबली होती. अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यात बुडाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाऊस सर्वदूर झाला असला तरी लातूर शहरात रस्त्यांवर पाणी, घरांमध्ये पाणी, काही भागांना तर तळ्याचे स्वरूप आले. उस्मानपुरा, मंत्री नगर, जुना औसा रोड, सम्राट चौक, पटेल चौक, डॉ. आंबेडकर चौक यासह शहरातील प्रत्येक भागात पाणी साचले. शहराच्या वळण रस्त्यांवरही पाणीच पाणी होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाखालील भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे तुडुंब झाला.
पहिल्यांदाच लातूर जलमय
कितीही पाऊस झाला तर लातूर शहरातील सखल भाग वगळता अन्यत्र पाणी साचल्याच्या घटना अभावानेच घडल्या आहेत.
वाचा >>महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मंगळवारी मात्र शहराचा प्रत्येक भाग जलमय झालेला होता. महापालिका आणि महसूल प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अनेक मोटारसायकली वाहून गेल्या. कुठे अडीच फूट तर कुठे पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते.
पंचनामे करण्याचे आदेश
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महापालिकेच्या मदतीला महसूलची पथके दिली.
मनपा कर्मचारीही पाण्याचा निचरा करण्यासाठी फिल्डवर आहेत. परंतु, कमी वेळात अधिक पाऊस, अर्धवट नालेसफाई, सखल भागातील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
पुलावरून पाणी, बॅरेजेसचे दरवाजे उघडले
रेणापूर ते कामखेडा जाणाऱ्या रस्त्यावर काळेवाडी नजीकच्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. रेणापूर ते उदगीर मार्गावरील सेवादास नगर येथेही पुलावरून पाणी वाहत होते. तर निलंगा तालुक्यात तेरणा नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडले आहेत.