हळदुर्गचे स्वस्त धान्य दुकान रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:50+5:302021-06-25T04:15:50+5:30
हळदुर्ग येथील स्वस्त धान्य दुकानदार बालाजी तात्याराव कांबळे यांनी एप्रिल, मे महिन्यातील धान्य अद्यापपर्यंत दिले नाही. मे महिन्यात पंतप्रधान ...

हळदुर्गचे स्वस्त धान्य दुकान रद्द
हळदुर्ग येथील स्वस्त धान्य दुकानदार बालाजी तात्याराव कांबळे यांनी एप्रिल, मे महिन्यातील धान्य अद्यापपर्यंत दिले नाही. मे महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजना व मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य असतानाही केवळ मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य वाटप केले, तेही पैसे घेऊन. लाभार्थ्यांना पावती देत नाहीत, अरेरावीची भाषा वापरतात, स्वत:च्या किराणा दुकानातून ज्यादा दराने धान्याची विक्री करतात, अशी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आली होती. अंत्योदय योजनेची साखर कार्डधारकांना दिली नाही, युनिटप्रमाणे धान्य दिले जात नाही, अशी तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी पडदुणे यांनी औसा तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले हाेते. समक्ष चौकशी करण्यात आल्यावर काही त्रुटी आढळून आल्या. मोफतचे धान्य पैसे घेऊन दिले, पावती दिली जात नाही, तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य वाटप केले गेले नसल्याचे आढळून आले. दुकानात सात ते आठ क्विंटल गहू शिल्लक असल्याचे दिसून आले. यावेळी दुकानदार कांबळे यांनी प्रकृती चांगली नसल्याने आपण दवाखान्यात एक दिवस ॲडमिट असल्याचे कारण सांगितले. प्रकृती ठीक झाल्यावर धान्य वाटप केल्याचेही त्यांनी सांगितले. आपली तक्रार राजकीय हेतूने करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकारी पडदुणे यांनी याप्रकरणी चौकशी करून सदरील दुकान रद्द केले असून बाजूच्या गावात लाभार्थ्यांची सोय करावी, अशा सूचना तहसीलदारांना केल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या गावाला हळदुर्ग जोडणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
तक्रारी वाढल्या...
लॉकडाऊन काळात शासनाने लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेतून मोफत धान्य दिले, अद्याप त्याचेही वाटप सुरू आहे. मात्र, काही दुकानदारांनी मोफतच्या धान्यातूनही कमाई केली. काहींना धान्यही कमी दिले. मात्र, तक्रार करावी कशी, यावर सर्वसामान्य लाभार्थी गप्प आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी वाढल्या असून तालुका पातळीवर येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड आहे.