गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:41 IST2020-08-21T19:37:36+5:302020-08-21T19:41:12+5:30

तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे.

Guru-Shishya's unique alchemy; Kaka Pawar's student Rahul Aware also gets Arjuna Award | गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार

गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार

ठळक मुद्दे केंद्रीय पुरस्काराची गुरू-शिष्याची हॅट्ट्रिक...संघर्षातुन मिळालेल्या यशाचा आनंद... 

- महेश पाळणे

लातूर : लातूरच्या मातीला कुस्ती खेळाचा सुंगध आहे. या मातीतून जन्मलेल्या दिग्गज मल्लानीं देशभरात अनेक आखाडे गाजविले. लातूरचे भूमिपुत्र असलेले अर्जुनवीर काका पवार यांच्या पाठोपाठ त्यांचा शिष्य राहुल आवारे यांनाही शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अर्जून पुरस्कार जाहीर केला. त्यामुळे मराठवाड्याची ही गुरु-शिष्याची जोडी हिट ठरली आहे. शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने विविध पुरस्कारांची घोषणा केली. यातील अर्जुन पुरस्कारांच्या यादीत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मराठवाड्याचा मल्ल राहुल आवारे यांचा समावेश आहे.

तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे. या जोरावर राज्य शासनाने त्यांची डीवायएसपी पदावर थेट नियुक्ती केली आहे. याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील असलेले राहुल आवारे यांनी कुस्तीत मराठवाड्याचे नाव रोशन केले आहे. या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

 केंद्रीय पुरस्काराची गुरू-शिष्याची हॅट्ट्रिक...
 लातूरचे रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार हे अर्जुनवीर काका पवार यांचे गुरू असून, त्यांना केंद्र शासनाने मेजर ध्यानचंद पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या पाठोपाठ शिष्य काका पवार यांना केंद्राचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तर त्यांचे शिष्य राहुल आवारे यांना नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून, मराठवाड्याच्या या गुरू-शिष्यानी केंद्राच्या सर्वोच्च पुरस्कारांची हॅट्ट्रिक केली आहे. 

संघर्षातुन मिळालेल्या यशाचा आनंद... 
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद वाटला. प्रामाणिकपणे मेहनत केल्याचे हे फळ आहे. नियमाने हा पुरस्कार मला पूर्वीच मिळायला हवा होता. मात्र, आता डबल पुरस्कार मिळाल्याचे मला जाणवत आहे. हरिश्चंद्र बिराजदार मामा, काका पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथंपर्यंत पोहोचलो, असे कुस्तीपटू राहुल आवारे यांनी सांगितले. 

कष्टाचे फळ मिळाल्याने आनंद...   
राहुल हा मेहनती मल्ल आहे. आजपर्यंत त्याने कुस्तीत खूप मेहनत घेतली आहे. या कष्टाचे पुरस्काराच्या रूपाने फळ मिळाले असल्याचे अर्जुनवीर काका पवार यांनी सांगितले.

Web Title: Guru-Shishya's unique alchemy; Kaka Pawar's student Rahul Aware also gets Arjuna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.