ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच वाजणार शाळांची घंटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:31+5:302021-07-10T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. ग्रामपंचायत, पालकांच्या नाहरकतीनंतर शाळांचीही घंटा ...

ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच वाजणार शाळांची घंटा !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. ग्रामपंचायत, पालकांच्या नाहरकतीनंतर शाळांचीही घंटा वाजेल, असे सूतोवाच शासनाने केल्याने अनेक गावांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने अनेक ग्रामपंचायतींनी शिक्षण विभागाशी संपर्क करून ठरावाच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात एकूण ९२८ गावे आहेत. त्यापैकी ८७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ५५ पेक्षा कमी गावांमध्ये कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र त्यासाठी आता ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांची नाहरकत घ्यावी लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी गटस्तरावर व शाळास्तरावर ग्रामपंचायतींना ठराव घेण्याबाबत कळविण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा गावांतील शाळा सुरू करता येणार आहेत. मात्र ग्रामपंचायतींचा आणि पालकांची नाहरकत त्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात २७१५ शाळा
जिल्ह्यात २ हजार ७१५ शाळा असून, यातील ग्रामीण भागात १२०० च्या आसपास शाळांची संख्या आहे.
ग्रामीण भागातील ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा गावांत असणाऱ्या शाळांची संख्या बाराशेच्या आसपास आहे. त्या शाळांची तयारी असल्याचे अनेकांनी सांगितले.
जिल्हा परिषदेने कोविड काळात प्रत्येक गावांत कोविड कॅप्टन विद्यार्थ्यांची नियुक्ती करून शिक्षण चालू ठेवले होते. त्या गावांतील शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवतील.
ग्रामपंचायतींना शाळास्तरावरून माहिती
जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित ग्रामीण भागात असलेल्या शाळास्तरावरून ग्रामपंचायतींना ठराव घेण्याची माहिती दिली जात आहे. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतींची विचारणा ठरावाबाबत शिक्षण विभागाकडे होत आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा ग्रामपंचायतींनी शिक्षण विभागाशी संपर्क करून ठराव घेण्यास सहमती दर्शविली आहे.
दीड-पावणेदोन वर्षापासून शाळा बंद आहेत. आता कोविडची रुग्णसंख्या घटली आहे. तरीपण काळजी आणि नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. सगळ्यांनी जबाबदारीने वागल्यास शाळा सुरू करता येतील. - सुनील भंडारे, पालक
शाळा बंद असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. आता जिल्ह्यात शंभरच्या आत ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या गावात रुग्ण नाहीत, त्या गावातील शाळा सुरू करण्यास काही हरकत नसावी. आमचीही त्यासाठी संमती असेल. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीने आणि नियमांचे पालन व्हावे. - हमीद मुजावर, पालक
शासनाचे पत्र नुकतेच आले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची सहमती शाळा सुरू करण्यासाठी लागणार आहे. त्या अनुषंगाने गट आणि शाळास्तरावर याबाबत माहिती कळवलेली आहे. शाळा, ग्रामपंचायतीला आणि पालकांना कळवून शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी, प्राथमिक