लातूर-औसा महामार्गावर शासकीय तांदूळ,डाळ तस्करीचा पर्दाफाश; दोन टेम्पोसह चालक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:58 IST2025-09-10T15:57:22+5:302025-09-10T15:58:09+5:30

औसा येथे शासकीय धान्याची तस्करी पकडली. हा माल कुठून आला आणि कुठे जात होता?

Government rice and dal smuggling busted on Latur-Ausa highway; Driver arrested along with two tempos | लातूर-औसा महामार्गावर शासकीय तांदूळ,डाळ तस्करीचा पर्दाफाश; दोन टेम्पोसह चालक ताब्यात

लातूर-औसा महामार्गावर शासकीय तांदूळ,डाळ तस्करीचा पर्दाफाश; दोन टेम्पोसह चालक ताब्यात

औसा (लातूर) : औसा- लातूर महामार्गावरील बुधोड्याजवळील उड्डाणपूल लगत एका टेम्पोमधून दुसऱ्या टेम्पोमध्ये शासनाचे तांदूळ आणि चनाडाळीचे कट्टे भरताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक आणि औसा पोलिसांनी संयुक्तपणे मंगळवारी सायंकाळी ६. ३० वाजता धाड टाकली. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेतले असून शासनाचे सिलबंद १०३ कट्टे तांदूळ, १५ कट्टे चनाडाळीसह दोन्ही टेम्पो असा एकूण १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी ६. ३० वाजता महामार्गावर लातूरकडे जाणाऱ्या बाजूस बुधोड्याजवळील उड्डाणपूलापासून काही अंतरावर दोन टेम्पो एकमेकांस चिकटून उभे करुन तांदूळ भरणे सुरू होते. या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह औसा पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथे धाड टाकली. यावेळी दोन्ही टेम्पोमध्ये ( एमएच २४ एयू ६५६१ आणि एमएच १४ बीजे ०७८६) मिळून १०३ कट्टे शासकीय तांदूळ आणि १५ चनाडाळीचे कट्टे आढळून आले. पोलिसांनी चालक अजय अर्जून जाधव ( ३७ रा.उतमी जि.धाराशिव) आणि दत्ता लक्ष्मण गायकवाड ( ४५ रा.मुरुड) यांना ताब्यात घेतले. 

हा शासकीय माल कुठून आला, कुठे जात होता. हे तपासात निष्पन्न होईल. प्रथमदर्शी तो राशनचा माल असल्याचे बोलले जाते. याबाबत औसा पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक प्रियंका बोरकर यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. या कारवाईत फौजदार मुजाहीद शेख,भाऊसाहेब माळवदकर, अतुल ढाके, मुबास शेख, संजय कांबळे, हणमंत पडिले, सोमनाथ खडके, भागवत क्षीरसागर, भागवत गोमारे,शिवाजी सोमवंशी संतोष चव्हाण, गंगाधर सुर्यवंशी यांचा समावेश होता. या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

Web Title: Government rice and dal smuggling busted on Latur-Ausa highway; Driver arrested along with two tempos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.