नांदेड-बीदर मार्गावरून जाताय, सावधान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:26+5:302021-07-20T04:15:26+5:30
लातूर : जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. सध्याला लातूर ते नांदेड राेड, आष्टामाेड ...

नांदेड-बीदर मार्गावरून जाताय, सावधान...
लातूर : जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. सध्याला लातूर ते नांदेड राेड, आष्टामाेड ते उदगीर या मार्गाचे काम सुरू आहे, तर नांदेड -बीदर मार्गावर केवळ थातूरमातूर दुरुस्तीचे काम केले जात आहे. या मार्गावरून प्रवास करत असाल तर सावधान.. या खड्ड्यांमुळे वाढू शकताे पाठदुखीचा आजार...अशीच स्थिती सध्याला आहे.
लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते गरुड चाैक नांदेड नाका या मार्गावर असलेल्या बाह्यवळण रस्त्याची तर माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठ-माेठे खड्डे पडले असून, प्रवास करणे अवघड झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्डयात पाणी साचत आहे. परिणामी, दरदिन छाेट्या-माेठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. गत अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी हाेत आहे. या मार्गावर माेठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ आहे. नांदेड-बीदर महागार्गावरील सुनेगाव-सांगवी ते ताेगरी या दरम्यान प्रवास करत असताना रस्त्यावरून वाहन जात आहे की, खड्डयातून हेच समजत नाही. एक खड्डा चुकवावा तर दुसरा खड्डा समाेर आहे. ही कसरत करत प्रवास करण्यासाठी तब्ब्ल अडीच पटींचा वेळ लागत आहे. यातून वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे.
या रस्त्यावर वाहनांची गती कमी ठेवलेलीच बरी...
नांदेड - बीदर रस्ता...
नांदेड, लातूर आणि बीदर जिल्ह्यांना जाेडणारा मार्ग म्हणून हा मार्ग महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरील सुनेगाव-सांगवी, अहमदपूर, शिरुर ताजबंद, हाळी हंडरगुळी, वाढवणा पाटी, उदगीर, ताेगरी या मार्गावर माेठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम थातूरमातूर सुरू आहे.
चाकूर - वाढवणा रस्ता...
लातूर जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या प्रमुख रस्त्याची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. हा मार्ग दाेन तालुक्यांना जाेडणारा प्रमुख आहे. परिणामी, या मार्गावर माेठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेकदा या रस्त्याचे काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात आले. सहा महिन्यांनंतर पुन्हा रस्ता जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, स्थानिक नागरिक, वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत.
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीचा आजारही वाढले...
लातूर जिल्ह्यातील प्रमुख मार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली. खड्ड्यामुळे माणक्यांची झीज हाेत आहे. पाठदुखीसह इतर आजार बळवत आहेत. त्याचबरेाबर गाडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च वाढताे. - साहेबराव निकाळजे.
नांदेड-बीदर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचबराेबर अहमदपूर - उदगीर दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. यातून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. - बालाजी बामणे
वय वाढले की हाडे ठिसूळ हाेतात. परिणामी, खड्डे असलेल्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे पाठदुखीला आमंत्रण दिल्यासारखे आहे. ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. वाहनांची गती कमी करूनच प्रवास करावा लागताे. छाेट्या वाहनातून प्रवास टाळावा. त्याचबराेबर कुठे हादरा बसला, लचक बसली तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचार करावा.
डाॅ. ओमप्रकाश कदम, लातूर.
रस्ता दुरुस्तीची तात्पुरती कामे...
लातूर जिल्ह्यात बहुतांश रस्त्याची कामे ही तात्पुरत्या स्वरूपात केली जात आहेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी वापरला जात आहे, तर काही ठिकाणी बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पुन्हा डांबर उखडत असून, कायमस्वरूपी रस्त्याचे काम करावे, अशी मागणी हाेत आहे.