अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2024 19:48 IST2024-02-10T19:48:05+5:302024-02-10T19:48:19+5:30
पाेलिसांच्या कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त...

अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या जुगारावर पाेलिस पथकाने शनिवारी एकाच वेळी छापा मारला. यावेळी ३८ जुगाऱ्यांना अटक केली आहे. उर्वरित १७ जुगारी फारर झाले आहेत. त्यांच्याकडून राेकड, जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिसात स्वतंत्र तीन गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर-चाकूर तालुक्यात माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु असून, त्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. त्यानुसार चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी अवैध व्यवसायची माहिती घेतली असता, अहमदपुरात विविध ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये, रूममध्ये काही जण मटका कल्याण, मिलन-डे, टाईम बाजार नावाचा जुगार खेळत हाेते. अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली.
या माहितीच्या आधारे त्यांनी अहमदपूर शहरात विविध ठिकाणी चालणाऱ्या मटका, जुगारावर एकाचवेळी छापा मारला. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ८६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात एकूण ५५ जुगाऱ्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.