२१ वर्षांपूर्वी हल्ला करून सोन लुटले, ओळख बदलत गावोगाव फिरला, अखेर पोलिसांनी पकडलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:46 IST2024-04-08T18:45:40+5:302024-04-08T18:46:35+5:30
आरोपी आपल्या कुटुंबासह मिळेल ते मजुरी, बांधकाम असे विविध काम करत गावोगाव फिरत होता.

२१ वर्षांपूर्वी हल्ला करून सोन लुटले, ओळख बदलत गावोगाव फिरला, अखेर पोलिसांनी पकडलेच
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे पती-पत्नीस धारदार शस्त्राने जखमी करुन सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास २१ वर्षांनी अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई किनगाव पोलिसांनी केली.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे सटवाजी मरीबा सूर्यवंशी (वय ७०) व त्यांच्या पत्नी शालुबाई सुर्यवंशी या दोघांना २२ सप्टेंबर २००३ च्या रात्री धारदार शस्त्राने जखमी करून शालुबाई यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व सेवन पीस असे सात ग्रॅम सोने जबरदस्तीने चोरून नेले होते. या प्रकरणी सटवाजी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन किनगाव गुन्हा नोंद होता. गुन्हयातील आरोपी पांडुरंग मरीबा नामपल्ले (रा. हिप्परगा चिटली, ता. लोहा) हा तेव्हापासून फरार होता. तो आपल्या कुटुंबासह मिळेल ते मजुरी, बांधकाम असे विविध काम करत गावोगाव फिरत होता.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे वास्तव्यास आहे. माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी एक पथक नेमले. या पथकात पोना. काळे, पोकॉ. सुनील श्रीरामे यांनी पाच दिवस सातत्याने आरोपीवर पाळत ठेवत पकडून अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोखरे करीत आहेत.