अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठ्याच्या नवीन जलवाहिनीवर अधिकृत नळधारकास मोफत नळजोडणी देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ६ हजार ५०० नळधारकांना लाभ होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता, तर मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रस्ताव सादर केला होता.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या वितरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नवीन जलवाहिनीवर कनेक्शन देण्यासाठी पालिकेचा ३ हजारांची अनामत भरून जोडणी देण्यासंबंधी प्रस्ताव होता. मात्र ४३ कोटींच्या जल योजनेत २ कोटी ९९ लाख शिल्लक राहत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यातून जुन्या जलवाहिनीवर असलेली अधिकृत ६ हजार ५०० कनेक्शन्स मोफत देण्याची शिफारस केली होती. त्यासाठी १ कोटी ६४ लाखांचा निधी लागणार होता. त्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवकांनी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यास यश आले असून शहरातील अधिकृत असलेली ६ हजार ५०० नळ कनेक्शन्स नवीन जलवाहिनीवर कुठलीही ठेव अथवा जोडणी शुल्क न घेता मोफत देण्यासंदर्भातील पालिकेच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अहमदपूरकरांच्या जोडणीसाठीच्या खर्चात बचत होणार आहे.
यात जुन्या ठरावाप्रमाणे पालिकेने काही भागामध्ये १ हजार ५०० जोडण्या दिल्या असून त्यासाठी ३ हजारांचा जोडणी शुल्क घेतला आहे. सदर जोडणी माफ केल्यामुळे सर्वांनी नवीन जोडणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिकृत नळधारकांना लाभ...
शहरात ७ हजार अधिकृत, तर तीन हजार अनधिकृत जोडण्या असल्याची पालिकेला अधिकृत नोंद आहे. अधिकृत नळधारकांना मोफत जोडणी मिळणार असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शिफारस केल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.
निविदा निघाल्यानंतर नळजोडणी...
याबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असून सदर प्रस्ताव निवेदनासाठी ठेवण्यात आला आहे. निविदा मंजूर होताच त्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा नगरअभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.
घेतलेली ठेव परत करा...
पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला असतानाही १५०० नळजोडण्या दिल्या. त्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये शुल्क घेतले. ही रक्कम संबंधित नागरिकांना परत द्यावी, अशी मागणी रवी महाजन, संदीप चौधरी, अभय मिरकले, फुजेल जहागीरदार यांनी केली.
पाणीपुरवठा नियमित करा...
शहरात सध्या १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्याचा कालावधी कमी करून किमान आठ दिवसातून एकदा पाणी उपलब्ध करून द्यावे व त्यानंतरच नळजोडणीची संबंधित कामे करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून मागील आठवड्यात विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्याने पाणीपुरवठ्याची अडचण झाली होती. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.