लातूर जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; पाटोदा माळहिप्परगा ओढ्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 23:54 IST2025-09-16T23:53:57+5:302025-09-16T23:54:16+5:30
जळकोट तालुक्यातील तिरु नदी, पाटोदा (खु.), माळहिप्परगा ओढ्यावरील घटना

लातूर जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; पाटोदा माळहिप्परगा ओढ्यावरील घटना
राजकुमार जाेंधळे, जळकोट (जि. लातूर) : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, जळकोट तालुक्यात मंगळवारी चौघेजण वाहून गेले आहेत. तिरु नदीमध्ये २८ वर्षीय तरुण तर पाटोदा (खु.) आणि माळहिप्परगा ओढ्याच्या पुलावरून जाताना ऑटो उलटला. त्यात केंद्रीय राखीव दलाची महिला पोलिस कर्मचारी व अन्य दोघे असे तिघेजण वाहून गेले.
ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. माळहिप्परगा येथून पाटोदा मार्गे उदगीरकडे ऑटो निघाला होता. वाटेत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे (वय ३५) यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अंधार असल्याने रिक्षा पाण्यात उलटली. पाण्याचा प्रवाह जोरदार होता. त्यात रिक्षातील केंद्रीय राखीव पोलिस दलाची महिला कर्मचारी सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी (वय ३२, रा. माळहिप्परगा), वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी), विठ्ठल धोंडिबा गवळे (५०, रा. पाटोदा बु.) हे तिघे वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तर रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे, बंटी उर्फ राकेश वाघमारे हे दोघेही झुडपांना धरून बचावले आहेत.
तर तिरु नदीवरून सुदर्शन घोणशेट्टे हा तरुण सकाळी १० वाजता वाहून गेला आहे. या चारही जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्यासाठी रामचंद्र पाटील, ग्रामसेवक फेरोज शेख, तलाठी आकाश पवार, सुधाकर बुके, परशुराम जानतिने, पोलिस पाटील फेरोज सिद्दीकी, धोंडिराम राठोड यांच्यासह दोन्ही गावांतील तरुण घटनास्थळी धावले आहेत. दरम्यान, तहसीलदार राजेश लांडगे, पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पथक दाखल झाले आहे. दोन्ही गावांतील पाचशेपेक्षा अधिक जमाव नदीच्या काठावर जमला आहे.
सूर्या उर्फ संगीता दिल्लीला निघाल्या होत्या...
सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी या केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवेमध्ये होत्या. त्या सुटीसाठी गावी आल्या होत्या. दरम्यान, सेवेत रूजू होण्यासाठी मंगळवारी त्या उदगीरमार्गे दिल्लीला जाणार होत्या. त्यासाठी गावातून आपल्या बहिणीच्या मुलासमवेत रिक्षाने उदगीरकडे जात होत्या. रस्त्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये रिक्षा वाहून गेली. त्यात चालकासह पाच जण होते. तिघांचा पत्ता लागला नाही. तर दोघे बचावले आहेत.
बचावकार्य वेगात, मदत पाेहचवू : माजी मंत्री बनसाेडे...
अतिवृष्टी झाली आहे. नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत आहे. अनेक पुलावरुन पाणी चालले आहे. काेणीही अनावश्यक धाडस करुन पाण्याच्या प्रवाहातून वाहने नेऊ नयेत, असे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसाेडे यांनी केले आहे. ते म्हणाले, जळकाेट तालुक्यात आतापर्यंत चार जण वाहून गेले आहेत. त्यांचे शाेधकार्य सुरु असून, संबंधितांच्या कुटुंबीयांना याेग्य ती मदत केली जाईल. शासन, प्रशासन तुमच्या साेबत आहे, असेही आ. बनसाेडे म्हणाले.